माळेगाव (ठेका) येथे खासदारांचे श्रमदान
By Admin | Updated: May 3, 2017 00:37 IST2017-05-03T00:37:57+5:302017-05-03T00:37:57+5:30
जलसंधारणाकरिता वॉटर कप स्पर्धेत अनेक हात काम करीत आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या या कामात आपलाही हातभार लागावा म्हणून

माळेगाव (ठेका) येथे खासदारांचे श्रमदान
‘वॉटर कप’ स्पर्धा : अधिकारी व ग्रामस्थांनी केले श्रमदान
वर्धा : जलसंधारणाकरिता वॉटर कप स्पर्धेत अनेक हात काम करीत आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या या कामात आपलाही हातभार लागावा म्हणून खुद्द खा. रामदास तडस यांनी श्रमदान केले. पाण्याच्या बचतीचा संदेश देण्याकरिता निवड झालेल्या आर्वी तालुक्यातील माळेगाव ठेका येथे श्रमदान करताना दिसून आले.
पाण्याचा वापर वाढत आहे. पावसाचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात जमिनीत मुरत नाही. यामुळे पाण्याचा वापर सांभाळून करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी वाचविण्याकरिता सर्व शेतकरी, स्वयसेवी संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे मत यावेळी खा. रामदास तडस यांनी पाणी फाऊंडेशन तर्फे आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत श्रमदान करताना केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेद्वारे २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने क्रांतीकारीच आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील टंचाईमुक्त होण्यास मदत होणार आहे. अभिनेते अमिर खान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे प्रत्येक गावामध्ये स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाईवर मात करण्याकरिता अनेकांनी पुढाकार घेतलेला आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरवीने आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी लोक चळवळ उभी केली आहे वाखाण्याजोगी आहे.
पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेतील आर्वी तालुक्यातील माळेगाव ठेका येथे श्रमदान करण्याकरिता पंचायत समितीचे माजी सदस्य अमित गोमासे, अभियंता शिंगाडे, कृषी सहायक विशाल बिरे, तलाठी फुलबांधे, प्रिया बाळसराफ, अंकित जयस्वाल, मेजर ब्रह्मानंद मुन, विपीन पिसे तसेच ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अनुष्काने दिली खाऊची रक्कम
नेरी (मिर्झापूर) येथील योगेश बाबाराव नागदेवते यांची मुलगी अनुष्का हिचा वाढदिवस होता. यावेळी तिने वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या खाऊची रक्कम व स्वत:कडून शक्य होईल ती रक्कम पाणी फाउंडेशनसाठी देण्याचे जाहीर केले. सोबतच वाढदिवसानिमित्त तिच्यासह कुटुंबातील सदस्यांनी श्रमदान केले. आज येथे माजी आमदार दादारावजी केचे व आर्वी पोलिसांनीही श्रमदान केले.