नायब तहसीलदारांना कारणे दाखवा
By Admin | Updated: November 21, 2015 02:25 IST2015-11-21T02:25:10+5:302015-11-21T02:25:10+5:30
येथील तहसील कार्यालयाचे वाहन रात्रभर बेपत्ता होते. सदर वाहन एका ओल्या पार्टीकरिता धाब्यावर उभे असल्याची चर्चा होती.

नायब तहसीलदारांना कारणे दाखवा
तहसीलचे वाहन प्रकरण : उत्तर न देता नायब तहसीलदार रजेवर
कारंजा (घाडगे) : येथील तहसील कार्यालयाचे वाहन रात्रभर बेपत्ता होते. सदर वाहन एका ओल्या पार्टीकरिता धाब्यावर उभे असल्याची चर्चा होती. या बाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकााशित होताच कारंजात खळबळ माजली. सदर प्रकरणात प्रभारी तहसीलदार मिलींद जोशी यांनी नायब तहसीलदार गणेश बर्वे यांना दोन दिवसात स्पष्टीकरण देण्याकरिता नोटीस बजावली. या नोटीसीचे उत्तर देण्याचे सोडून सदर अधिकारी कार्यालयात सुट्या टाकून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, तहसील कार्यालयाचे वाहन रात्रभर बेपत्ता होवून दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक कार्यालयात हजर झाले. सदर वाहन नायब तहसीलदार बर्वे यांच्या ताब्यात असून त्यांनी ते ओल्या पार्टीकरिता वापरल्याची चर्चा कार्यालयात होती. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताला एका धाबा मालकाकडूनही दुजोरा मिळाला होता. या संदर्भात प्रभारी तहसीलदारांकडून चौकशी सुरू झाली असून त्यांनी नायब तहसीलदार बर्वे यांच्यासह वाहन चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिवाय यासंदर्भात उपविभागीय अधिकारी शुभांगी अंधाळे यांनीही नायब तहसीलदार गणेश बर्वे यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे.(शहर प्रतिनिधी)