नॉनक्रिमिलेअर व जात प्रमाणपत्रांसाठी ताटकळ
By Admin | Updated: October 25, 2014 22:46 IST2014-10-25T22:46:09+5:302014-10-25T22:46:09+5:30
मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून नागरिकांना नॉनक्रिमिलेअर तसेच जातप्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे़ यासाठी नागरिकांना पुलगाव येथील तहसील कार्यालयाचे उंबरठे

नॉनक्रिमिलेअर व जात प्रमाणपत्रांसाठी ताटकळ
नाचणगाव : मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून नागरिकांना नॉनक्रिमिलेअर तसेच जातप्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे़ यासाठी नागरिकांना पुलगाव येथील तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी होत आहे़
पुलगाव शहर तसेच लगतचा ग्रामीण भाग या सर्वांना आपले जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पुलगाव येथील नायब तहसील कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. किंबहुना या कार्यालयातून सदर प्रमाणपत्र तयार होतात व नंतर ते उपविभागीय कार्यालय वर्धा येथे पाठविण्यात येतात़ यावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर ते पुलगाव तहसील कार्यालयाला प्राप्त होते़ यानंतर त्या प्रमाणपत्रांचे वितरण संबंधित नागरिकांना केले जाते; पण गत दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयातून गेलेली प्रमाणपत्रे वर्धेवरून आलीच नसल्याचे तहसील कार्यालयास भेट दिल्यावर सांगण्यात आले़ नागरिकांच्या सुविधेच्या असलेली यंत्रणा मात्र नागरिकांच्या कामासाठी कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. प्रमाणपत्राअभावी शासकीय कामात अडथळा येत आहे; पण तेच प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अडथळा आणला जात आहे़ या प्रकारामुळे नागरिक हतबल झाले आहे़ आपल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याकरिता ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी, तहसील कार्यालयाच्या चकरा मारताना ते मेटकुटीस आले आहेत़ संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देत त्वरित प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे़(वार्ताहर)