जिल्हा रुग्णालयात रित्या ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST2021-04-22T05:00:00+5:302021-04-22T05:00:10+5:30

जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. पण दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्याच्या तुलनेत उपलब्ध आरोग्य सुविधा काही प्रमाणात तोकडी पडत आहे. प्रत्येक कोविड बाधिताला वेळीच चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये तब्बल १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

Shortage of regular oxygen cylinders in the district hospital | जिल्हा रुग्णालयात रित्या ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा

जिल्हा रुग्णालयात रित्या ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा

ठळक मुद्देरिफिलिंगसाठी दररोज करावी लागतेय तारेवरची कसरत : कोविड युनिटमधील रुग्णखाटा फुल्ल झाल्याने वाढली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये तब्बल १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयातील सर्वच ऑक्सिजन बेड फुल्ल झाल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात छोटे-मोठे एकूण ९९ ऑक्सिजन सिलिंडर असून रुग्णालय प्रशासनाला रिफिलिंगसाठी दररोज तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. पण दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्याच्या तुलनेत उपलब्ध आरोग्य सुविधा काही प्रमाणात तोकडी पडत आहे. प्रत्येक कोविड बाधिताला वेळीच चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये तब्बल १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, सध्या हे संपूर्ण बेड फुल्ल असल्याने या रुग्णालयाची मेडिकल ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे छोटे-मोठे असे एकूण सुमारे ९९ ऑक्सिजन सिलिंडर आहेत. याच सिलिंडमध्ये साठवणूक केलेला प्राणवायू आयसोलेशन वॉर्डच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन कंट्रोल रूममधून कोविड युनिटमध्ये दाखल असलेल्या ॲक्टिव्ह कोविडबाधिताला ऑक्सिजन वाहिनीच्या माध्यमातून दिला जातो. पण उपलब्ध असलेले सर्वच सिलिंडर सध्याच्या ऑक्सिजन मागणीच्या तुलनेत अपुरे पडत असल्याने रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांना रिकामे ऑक्सिजन सिलिंडर वेळीच भरून आणून कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

देवळी येथून होतो ऑक्सिजनचा पुरवठा
जिल्हा सामान्य रुग्णालयाला देवळी येथील प्राणवायू प्रकल्पातून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
रिकामे झालेले ऑक्सिजन सिलिंडर वेळीच देवळी येथील प्रकल्पात पाठविले जात असून ते वेळीच भरून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जात आहेत. 
असे असले तरी किमान १०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची गरज जिल्हा सामान्य रुग्णालयाला हल्ली असल्याचे सांगण्यात आले.

मदतीसाठी उद्योजक अन् सामाजिक संघटना पुढे येणार काय?

कोरोना संकटाच्या काळात वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रित्या ऑक्सिजन सिलिंडचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटना, उद्योजक, व्यावसायिक पुढे येत सरळ हाताने मदत करतील काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे हिंगणघाट शहरात सामाजिक संघटना आणि उद्योजकांच्या पुढाकार आणि मदतीतून कोविड रुग्णालय उभे झाले आहे.

दिवसातून तीन वेळा ऑक्सिजन सिलिंडरची ने-आण
तोकड्या ऑक्सिजन सिलिंडरच्या भरवश्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या मोठी मजल मारत आहे. 
देवळी येथून जिल्हा सामान्य रुग्णालयाला ऑक्सिनचा पुरवठा होत आहे. प्रत्येक दिवशी किमान तीन वेळा रिकामे ऑक्सिजन सिलिंडर देवळी येथे नेऊन भरलेले ऑक्सिजन सिलिंडर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले जात आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे सध्या छोटे-मोठे एकूण ९९ ऑक्सिजन सिलिंडर आहेत. प्रत्येक दिवशी किमान तीन वेळा ऑक्सिजन देवळी येथून आणले जात आहे. रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरची जिल्हा सामान्य रुग्णालयाला गरज आहे.
- डॉ. संगीता भीसे,                                          प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.
 

 

Web Title: Shortage of regular oxygen cylinders in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.