भारनियमनाचा शेतकऱ्यांना फटका
By Admin | Updated: April 13, 2016 02:26 IST2016-04-13T02:26:42+5:302016-04-13T02:26:42+5:30
तालुक्यातील हिवरा, बेढोणा, पिंपळखुटा परिसरात बागायती पिकांची लागवड केली जाते.

भारनियमनाचा शेतकऱ्यांना फटका
शेकडो एकर जमीन ओलितापासून वंचित
आर्वी : तालुक्यातील हिवरा, बेढोणा, पिंपळखुटा परिसरात बागायती पिकांची लागवड केली जाते. येथे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र अनियमित भारनियमनामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहे. रात्री १२ वाजतापासून सकाळी ९.४५ या वेळेत भारनियमन केले जाते. याशिवाय दिवसभरात चार ते पाचवेळा ब्रेकडाऊन होत असल्याने वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे पाणी असताना शेतकऱ्यांना ओलित करणे अवघड झाले आहे.
हिवरा गावाच्या फिडरवर हिवरा, राजनी, जामखुटा, बेढोणा, चिंचोली, पाचोड, हर्राशी, हिवरातांडा यासह अनेक परिसरातील गावांना वीज पुरवठा केला जातो. या फिडरवरील मोटारपंप सारखे बंद असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरूवार या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ पर्यंत थ्री फेज लाईन सुरू असते. तर शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी रात्री १२ वाजतापासून सकाळी ९.४५ पर्यंत वीज पुरवठा खंडित केल्या जातो. अधिकधिक वेळा वीज खंडित राहत असल्याने संत्रा, भुईमुग, भाजीपाला पिकाला ओलित करता येत नाही. यामुळे पीक करपण्याचा धोका आहे. यापूर्वी या गावांना वाढोणा फिडरवरून वीज पुरवठा होत असे. हिच स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयात जावून अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर वीज पुरवठा नियमित केला होता. मात्र हिवरा फिडरवर हीच समस्या असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)