शोभायात्रेने शिवरायांना मानाचा मुजरा
By Admin | Updated: February 20, 2016 02:55 IST2016-02-20T02:55:33+5:302016-02-20T02:55:33+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्धेसह जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

शोभायात्रेने शिवरायांना मानाचा मुजरा
शिवाजी चौकात विविध कार्यक्रम : सकाळपासून शहरात रॅली व मिरवणुका
वर्धा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्धेसह जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वर्धेत सकाळपासून शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानाचा मुजरा देण्याकरिता वर्धेकरांची सकाळपासूनच गर्दी बघायला मिळाली. या चौकाला भगव्या पतकांनी सजविले होते. दिवसभर शहरातून निघालेल्या मिरवणुका त्यातच डोक्याला भगवे फेटे बांधून दुचारीवर निघालेली महिलांची व पुरुषांची मिरवणूक लक्षवेधत होते.
जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी शिवाजी महाजांच्या पुतळ्याला पुष्पमाला घालून अभिवादन केले. शहरातील विविध संघटनांच्यावतीने महाराजांना अभिवादन करण्यात आले. पुष्पहारांचा वर्षाव करण्यात आला. ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या जयघोषांनी वर्धानगरी दुमदुमली.
रामनगरातील युवा चौकातून परिसरातून युवा सोशल फोरम व विविध संघटनांच्यावतीने सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. सिंहासनावरुन विराजमान शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पुढे ढोल-ताशांचा गरज करीत निघालेले ढोल-ताशा पथक त्यांनतर समाजातील विविध पैलूवर संदेश देणारे देखावे हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. ही मिरवणूक बघण्याकरिता रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झालेली होती. रात्री उशिरा ही मिरवणूक शिवाजी चौकात पोहचली. यानंतर शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शिवाजी चौक परिसर भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता. शहरातील विविध भागांतून भगव्या पताका घेवून युवक युवतींच्या अनेक मिरवणुका निघाल्या. संभाजी ब्रिगेड, क्षत्रिय मराठा महासंघ, युवा ब्रिगेड, छावा संघटना यासह विविध संघटनेच्यावतीने शिवरायांना अभिवादन केले.शहरातील मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पुतळ्याजवळ वाहतुकीची कुठलीही कोंडी होणार नाही, याकरिता पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त होता.