शिमग्यापर्यंत घरावर तुळशीपत्र
By Admin | Updated: December 12, 2015 04:53 IST2015-12-12T04:53:14+5:302015-12-12T04:53:14+5:30
दिवाळी सरताच ऊस तोडणाऱ्या २० ते २५ मजुरांना घेऊन त्यांचा मुखिया निघतो. हाती असेल ते धोपटी बेलनं घेऊन मालवाहू

शिमग्यापर्यंत घरावर तुळशीपत्र
ऊस कटाई कामगारांची व्यथा : सहा महिने घरापासून दूर असलेल्या कष्टकरी मजुरांचे वास्तव
पराग मगर ल्ल वर्धा
दिवाळी सरताच ऊस तोडणाऱ्या २० ते २५ मजुरांना घेऊन त्यांचा मुखिया निघतो. हाती असेल ते धोपटी बेलनं घेऊन मालवाहू गाडीत ही मंडळी निघतात. म्हातारी मंडळी घरी ठेवून सोबत आळसावलेली लहान मुलं आणि हाती लागेल ती गरजेची वस्तू घेऊन प्रवास सुरू होतो. सकाळी उठणं, चार घास पोटात ढकलून दिवसभर उसाची कटाई. चार ते सहा महिने रोजचा हाच नित्यक्रम. आज या शेतात तर उद्या वेगळ्या. सोप्या शब्दात सांगायचं तर काम संपेपर्यंत ठेकेरादाचे वेठबिगार. भर थंडीतलच काम. ऊस तोडणीवर जात असलेल्या प्रत्येक परिवाराची हीच कहाणी. दुखभरी नसली तरी खुशहालही नक्कीच नाही. विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील यवतमाळ जिल्ह्यातील उस तोडणीचे काम करणारी अनेक कुटूंब सध्या वर्धा जिल्ह्यात दाखल झाली आहे. गावोगावी त्यांचे पाल दिसताहेत. होळीपर्यंत हेच चित्र. त्याच्या जीवनाचा घेतलेला हा आखोदेखा धांडोळा
गत काही वर्षात वर्धा जिल्ह्यात ऊसाची लागवड वाढली आहे. कापूस, सोयाबीन यांचे नुकसान भरून निघावे म्हणून ओलिताची सोय असलेले शेतकरी अर्धा ते एका एकरात ऊसाची लागवड करीत आहेत. ऊस कटाईची हातोटी अद्यापही आपल्याकडील शेतमजुरांना जमलेली नाही. त्यामुळे ऊसकटाईची जाण असलेल्या मराठवाडा भागातील तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील मजुरांची यावेळी मागणी वाढते. यातून ऊसकटाईचे गणित सुरू होते. ऊसकटाईचा सर्व खर्च उस कारखाना करीत असतो. कारखान्यामार्फत काही ठेकेदार नेमले जातात. हे ठेकेदार ऊस तोडणाऱ्या टोळीशी संपर्क साधून असतात. अश्या अनेक टोळ्यांशी बोलणी करून कटाईचे हुंडे घेतले जातात. विशेष म्हणजे, या कामगारांना मजुरीचा हुंडा हा आधीच दिला जातो. यात जमेची बाजू ही शेतकरी वर्गाला आपल्या खिशातून एकही रुपया द्यावा लागत नाही. ऊस नेण्यापासूनचा सर्व खर्च कंपनी करते. एका शेतातील ऊस तोडला की लगेच ठेकेदार घेऊन जाईल त्या शेतात ऊस तोडणी सुरू. एका एकरातील ऊस तोडायला जवळपास आठवडा लागतो. आठवडा आठवडा करीत चार ते सहा महिने निघून जातात. हाताला मिळालेली १० ते २० हजारांची मिळकत घेऊन पुढच्या हंगामाची वाट पाहात. या सहा महिन्यात अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी असतात. कधी मुलाबाळांच्या तब्येती, महिलांची बाळंतपणं सारं काही याच प्रवासात. पैसे आधीच घेतलेले असतात, त्यामुळे अर्धवट काम सोडून जाताही येत नाही. या दिवसांमध्ये घरी आईवडील जगले वाचले हे बघायलाही फुरसत नाही. मुलांच्या शिक्षणाचाही खेळखंडोबा. केवळ ती सोबत आहेत एवढाच दिलासा. मुलंही शेतशिवारात आईवडिलांना पाहून पाहूनच सत्तूर चालवायला शिकतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्याही हाती लेखणीच्या जागी कालांतराने सत्तूरच दिसते.
मजूर असतात दावणीला
४ठेकेदार मजुरांच्या मुखियासोबत व्यवहार करीत असतो. यात अनेकदा मुखियाकडून पैसे घेऊन मजूर पळूनही जातात. अश्यावेळी ठेकेदाराच्या पैशाची वसुली होत पर्यंत इतर मजुरांना जास्तीचे काम करावे लागते. सकाळपासून उसतोडणी सुरू होते. मजूर ऊस तोडत असताना त्यांची मुलेही शेतभर हिंडत असतात. यात शेतमालक चांगले असल्यास या मुलांना काही खायला प्यायला मिळून जाते. अन्यथा सकाळपासून उपाशी असलेली ही मुलेही ऊस खाऊनच बराच बेळ घालवितात. पोटूशी असलेल्याही अनेक स्त्रिया उसतोडणीसाठी असतात. पुरुषही महिलांची काळजी घेतातच असे नाही. त्यामुळे ऊसाच्या फडातच अनेक स्त्रियांची बाळंतपणं होतात. पण आधीच पैसा घेतलेला असल्याने हातचं. कामही टाकता येत नाही. कधी घरच्या पुरुषाची तब्येत बिघडते. सर्पदंश होतो. अश्यावेळी एकट्या स्त्रीला सगळी कामे करावी लागतात. ठेकेदाराचे दावण अश्यावेळी जास्तीच घट्ट होतं. या सर्व परिस्थितीवर मात करीत हे मजूर उस तोडतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या वाट्याला जास्तीचे कष्ट असतातच. पण शेवटी त्यांच्याशिवाय जोडी तरी कशी पूर्ण होणार.
जोडीनेच मजुरी
४ऊस तोडणीत विशेषत्वाने असलेली गोष्ट म्हणजे येथे मजुरांची जोडी मिळून काम करीत असते. बरेचदा ही जोडी नवरा बायको किंवा बहीण भाऊ अशा स्वरूपाची असते. यामध्ये पुरुष ऊस तोडत असतो तर माहिला ऊसावरील हिरवी पानं वेगळी तोडून त्याचे भारे बांधतात. हे भारे विकण्याचा अधिकारही त्या मजुरांना असतो. त्यामुळे जितका जास्त ऊस ही जोडी तोडेल तेवढेच जास्त हिरव्या पानांचे भारे ते विकू शकतात. हिवाळ्यात त्यांना चांगली मागणीही असते. हा पैसा त्यांची वरकमाई असतो. यात ठेकेदाराचाही हस्तक्षेप नसतो. शेतमालकाचा तर नाहीच नाही.
सगळा व्यवहार रोख
४ठेकेदार या मजुरांना सर्व पैसा हा रोख स्वरुपात देतात. त्यामुळे तो खर्च होण्याचाच धोका जास्त असतो. अद्यापही या मजुरांचे बँक खाते नाही. त्यामुळे अनेकदा चोरीचे प्रकारही घडतात. पण अनोळखी जागा, अनोळखी लोक त्यामुळे दाद कुणाला मागणार.
मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
४शासनाने एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शिक्षण हक्क कायदा अस्तित्त्वात आणला आहे. परंतु पोटासाठी भटकत असलेल्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कायम दुय्यम स्थानावर ठेवला जातो. ऊस कटाई करीत असलेल्यांची जवळपास शंभरावर मुले केवळ वर्धा तालुक्यात आजघडीला शेतात आईवडिलांसोबत भटकत आहेत. पवनार शिवारात मध्यंतरी आलेल्या एका पालावरच जवळपास १० ते १२ मुले होती. त्यांच्या अंगावर असलेले मळलेले शाळेचे गणेवेश ते कुठल्याना कुठल्या वर्गात असल्याचे सांगत होते. दरवर्षी सहा महिने ऊसकटाई कामगारांची शेकडो मुले त्यांच्यासोबत भटकत असतात. शासनापासून ही बाब लपलेली नाही. परंतु त्यांच्यासाठी कुठलीही शैक्षणिक व्यवस्था केली जात नाही. त्या मुलांना पाहून एखादा एनजीओ फोटो काढण्यापुरता त्यांना भेटी देतो. परंतु परत सगळी परिस्थिती तशीच वर्षानुवर्षे हाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे ही मुले मोठी होऊन ऊस तोडणारी मजूर केव्हा बनतात हे कळतही नाही.