नदीपात्रातील पैसे गोळा करण्याकरिता चुंबकाची शक्कल
By Admin | Updated: October 7, 2015 00:48 IST2015-10-07T00:48:42+5:302015-10-07T00:48:42+5:30
बालमजुरी कशाला म्हणावी हा प्रश्न बरेचदा उपस्थित होतो.

नदीपात्रातील पैसे गोळा करण्याकरिता चुंबकाची शक्कल
लहान मुलांचा जीव धोक्यात : गणेशोत्सवात झाली मोठी कमाई; दुर्गोत्सवाची साऱ्यांनाच प्रतीक्षा
पराग मगर वर्धा
बालमजुरी कशाला म्हणावी हा प्रश्न बरेचदा उपस्थित होतो. अनेक बालक घरच्या परिस्थितीमुळे किंवा शिक्षणासाठी जमेल ते काम करून शिकता शिकताही कमवितात. पवनार येथील धाम नदीपात्रात सध्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चुंबकाच्या सहाय्याने पैसे जमा करीत असलेल्या लहान मुलांची फौज तयार झाल्याचे चित्र आहे.
पवनार येथील धाम नदीला धार्मिक महत्त्व आहे. येथे मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती व दुर्गामूर्ती विसर्जनासाठी येतात. सोबतच दहावा दिवस व तर्पणविधी करण्यासाठी शेकडो नागरिक दररोज येथे येतात. यावेळी पूजेदरम्यान नदीत काही चिल्लर पैसे फेकले जातात. आधी हे पैसे पोहणारे मासेमार शोधत असत. या काही दिवसांत लहान मुलांनी शक्कल लढवित ताराला चुंबकाचे रिंग लावून त्याला दोर बांधून पैसे शोधण्याची नवी युक्ती शोधून काढली आहे. यामध्ये कमी मेहनतीत आणि कमी जोखमीत मुले सहज पैसे शोधत आहे. यामध्ये आता बरीच लहान मुले तरबेज झाली आहे. पण या पैशाचे ही मुले करतात काय याचा शोध घेतला असता बरीच मुले हे पैसे आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी वापरतात. म्हणजे एकप्रकारे जिभेचे चोचले आणि खर्रा, गुटखा यासारखे शौक पूर्ण करण्यासाठीच ही मुले जीव मूठीत घालून हा प्रकार करीत असल्याचे वास्तव आहे.