शहीद पीएसआय किरणकुमार धोपाडे यांना कार्यक्रमातून श्रद्धांजली
By Admin | Updated: October 22, 2016 00:51 IST2016-10-22T00:51:10+5:302016-10-22T00:51:10+5:30
गौरवपूर्ण कामगिरी करताना शहीद झालेल्या पोलिसांना पोलीस शहीद दिनानिमित्त शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शहीद पीएसआय किरणकुमार धोपाडे यांना कार्यक्रमातून श्रद्धांजली
कारंजा (घा.) : गौरवपूर्ण कामगिरी करताना शहीद झालेल्या पोलिसांना पोलीस शहीद दिनानिमित्त शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम शहीद पोलिस ज्या प्राथमिक शाळेत शिकला तेथे शासकीय स्तरावर घेण्यात आला. या अंतर्गत येथील प्राथमिक केंद्र शाळेत ४१ वर्षापूर्वी शिकलेल्या आणि कर्तव्य बजावताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार दिगंबर धोपाडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शिकत असलेल्या शाळेतून असेही विरमरण प्राप्त करणारे विद्यार्थी घडले याची माहिती सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी आणि सत्कर्म प्रेरणा मिळावी म्हणून शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे.
कारंजा जि.प. केंद्र शाळा येथे ठाणेदार विनोद चौधरी, किरणकुमार यांची पत्नी सविता, बहीण कविता, मुलगी सायली आणि साक्षी तसेच गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते. मुलांना धोपाडे यांच्या कार्याची माहिती दिली. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत बेवारटोला या गावात धरण बांधण्याचे काम सुरू होते. धरणातील कडक जागा फोडण्यासाठी स्फोटक द्रव्याची गरज होती. हा परिसर नक्षलवादी असल्यामुळे येथे विकास कामे होवू द्यायची नाहीत असा नक्षलवाद्यांचा उद्देश होता. नक्षलवादी हे स्फोटक द्रव्य धरणाचे ठिकाणी पोहचविण्यात अडथळा करीत असत. अशा धोकादायक परिस्थितीत स्फोटक द्रव्याने भरलेली व्हॅन तलावापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ठाणेदार म्हणून किरणकुमार धोपाडे यांनी घेतली. ३० आॅगस्ट २००५ ला स्फोटक द्रव्य भरलेली व्हॅन घेऊन जात असताना संरक्षणार्थी म्हणून पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार धोपाडे आणि ठाणेदार वामन गाडेकर व इतर पाच कर्मचारी जात होते. दरम्यान नक्षलवाद्यांनी येथे आधीच भूसुरंग पेरले होते. त्याच्या स्फोट घडवून आणला. यात किरणकुमार धोपाडे शहीद झाले, अशी वीरगाथा गोंदियाचे उपनिरीक्षक तुषार काळेल यांनी सांगितली.
ठाणेदार चौधरी, केंद्रप्रमुख बारापात्रे, राम प्रांजळे, नगराध्यक्ष बेबी कठाणे यांनी संवेदना व्यक्त केल्या. संचालन स्मीता लांजेवार तर प्रास्ताविक रजनी बेलूरकर यांनी केले. उपनगराध्यक्ष नितीन दर्यापूरकर, सविता धोपाडे व उपस्थित नागरिक यावेळी भावनिक झाले होते.(तालुका प्रतिनिधी)