शिलाई मशीन; तालुक्यात अपात्रच अधिक
By Admin | Updated: December 28, 2015 02:23 IST2015-12-28T02:16:56+5:302015-12-28T02:23:28+5:30
जि.प. समाज कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील महिलांना १०० टक्के अनुदानावर शिलाई मशिन देण्यात येते.

शिलाई मशीन; तालुक्यात अपात्रच अधिक
जिल्हा परिषदेची योजना : ६९ ग्रामपंचायतीमधील अर्ज ठरविले बाद
आर्वी : जि.प. समाज कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील महिलांना १०० टक्के अनुदानावर शिलाई मशिन देण्यात येते. यात २०१५-१६ या आर्थिक वर्षातील जि.प. ने प्रसिद्ध केलेल्या यादीत आर्वी तालुक्याला सर्वात कमी लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी ग्रा.पं. स्तरावर महिलांचे अर्ज भरण्यात आले; पण ते सदोष असल्याने सर्वाधिक अर्ज अपात्र ठरविण्यात आलेत.
तालुक्यात ६९ ग्रा.पं. असून यात जि.प. समाजकल्याण विभागांतर्गत १०० टक्के अनुदानावर ग्रामीण भागातील महिलांना स्वतंत्र रोजगार करण्यासाठी शिलाई मशिन वाटप करण्यात येते. ग्रामसचिवामार्फत लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाणनी करून व योग्य माहितीत लाभार्थ्यांचा अर्ज भरून ती नावे आणि अर्ज गटविकास अधिकारी तथा पं.स. कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेकडे पाठविले जातात. जिल्हा परिषदेमध्ये पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. २०१५-१६ या आर्थिक वर्षात लाभार्थ्यांचे अर्ज परिपूर्ण माहितीसह ग्रा.पं. स्तरावर भरण्यात आले नाही. यामुळे जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत तालुक्यातील ६९ ग्रा.पं. मधील सर्वाधिक लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
या योजनेत ग्रा.पं. स्तरावर प्रत्येक गावातून दहा ते बारा लाभार्थी नावे निश्चित केली जातात; पण जि.प. ने १०० टक्के लाभार्थ्यांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत अपात्र लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. देण्यात आलेल्या निर्धारित लाभार्थी संख्येत आर्वी तालुका मागे पडला आहे.
यामुळे गरजू लाभार्थी महिलांवर योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देत गरजू महिलांना लाभार्थी यादीत स्थान देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)