सात-बारासाठी वसुली मोहीम; शेतकरी त्रस्त

By Admin | Updated: July 1, 2014 01:39 IST2014-07-01T01:39:13+5:302014-07-01T01:39:13+5:30

आधीच आर्थिकदृष्टया कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी संगणकावरील उतारा काढण्यासाठी ३० रुपयांची आगाऊ वसुली केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Seven-twelve recovery campaign; Farmers suffer | सात-बारासाठी वसुली मोहीम; शेतकरी त्रस्त

सात-बारासाठी वसुली मोहीम; शेतकरी त्रस्त

वर्धा : आधीच आर्थिकदृष्टया कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी संगणकावरील उतारा काढण्यासाठी ३० रुपयांची आगाऊ वसुली केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता शासनाच्या आदेशानुसार आम्ही संगणकाची खरेदी केली आहे. आकारलेल्या पंधरा रुपयांतील पाच रुपये शासनाकडे भरावयाचे असून दहा रुपये संगणक खरेदीच्या रकमेच्या वसुलीसाठी ठेवायचे असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याच्या महसूल विभागात सध्या ई-गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. अचुकता, तत्परता साधत कामात गतिमानता आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सात-बारा, उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत.
संगणकावरील छपाईचे सात-बारा उतारे देण्याचे आदेश तहसीलदारांनी एक वर्षापूर्वीच सर्व तलाठ्यांना दिले आहे. मात्र अनेक तालुक्यात विविध भागात आजही हस्तलिखितातील सातबारे दिले जातात. कामात गतिमानता नसल्याने शेतकऱ्यांना तासनतास तलाठी कार्यालयात ताटकळत बसावे लागते. एका तलाठ्याकडे अनेक गावांचा कार्यभार असल्याने उतारे मिळविण्यासाठी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. शासन आपल्या दारी असा नारा प्रशासन देत असला तरी शेतकऱ्यांची गैरसोय कमी होताना दिसत नाही. सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत. बँकांमध्ये कर्ज प्रकरणे करण्यासाठी शेतकऱ्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या दारी हेलपाटे मारावे लागतात.
अनेकदा तलाठी मुख्यालयी रहात नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेचा खोळंबा होत आहे. ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक गोची सुरू असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Seven-twelve recovery campaign; Farmers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.