दहशत माजविणारे सात जण ताब्यात
By Admin | Updated: November 13, 2015 02:09 IST2015-11-13T02:09:15+5:302015-11-13T02:09:15+5:30
हातात तलवार व अन्य धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्या सात जणांवर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

दहशत माजविणारे सात जण ताब्यात
हिंगणघाट येथील घटना : हातात शस्त्र घेऊन फिरताना अटक
वर्धा : हातात तलवार व अन्य धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्या सात जणांवर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई हिंगणघाट येथील भगतसिंग वॉर्डात बुधवारी करण्यात आली.
दत्ता, अविनाश हजारे, समीर भादा, शिरसाट या चार जणांसह अन्य तिघांचा यात समावेश आहे. त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हे सात जण बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातात शस्त्र घेऊन फिरत होते. शिवाय रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना धमकावित होते. याबाबत शालिनी पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी गाठून शस्त्रांसह सातही जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४४, १४७, १४८ अन्वये गुन्हा दाखल केला.(स्थानिक प्रतिनिधी)
रांगोळीच्या दुकानातून जनरेटर पळविले
शहरातील बजाज चौक परिसरात असलेल्या एका रांगोळीच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने जनरेटर चोरून नेले. यात दुकान मालकाचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत गुरुवारी शहर ठाण्यात शुभांगी शेंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
मद्याच्या नशेत मुलांना मारहाण
मद्याच्या धुंदीत असलेल्या इसमाने स्वत:च्या ८ व १० वर्षीय मुलांना काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना जोगाहेटी येथे गुरूवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. याबाबत देविदास सिडाम यांनी कारंजा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून प्रकाश टेकाम याच्यावर कलम ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
खोट्या सह्या करून साडे पाच लाखांची अफरातफर
धनादेश तसेच अन्य कागदपत्रावर खोट्या सह्या करून खात्यातून साडे पाच लाख रुपयांची रक्कम अन्य खात्यात वळती केली. तसेच खातेदार दीपक पाटील रा. गौळ यांना साडे पाच लाखांनी गंडविले. याबाबत पाटील यांनी देवळी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अमोल कसनारे याच्यावर कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक पाटील यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत खाते आहे. या खात्यात असलेल्या रकमेचे धनादेश व विड्रॉलवर कसणारे यांनी खोट्या सह्या करून परस्पर रक्कम वळती केली. ही बाब पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. घटनेचा तपास देवळी पोलीस करीत आहेत.
क्षुल्लक वादातून मारहाण
शिवीगाळ करण्यास हटकले असता झालेल्या वादातून गजानन नागोसे याला अंकुश भानखेडे याने मारहाण करून जखमी केले. ही घटना पिंपळगाव येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत गजाननने गिरड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला.