सात महिन्यांपासून १७ ट्रॅक्टर पासिंगविना
By Admin | Updated: June 6, 2014 00:07 IST2014-06-06T00:07:17+5:302014-06-06T00:07:17+5:30
मागासर्गीय महिला बचत गटासाठी असलेल्या योजनेंतर्गत समाजकल्याणच्या वतीने १७ बचत गटांना ट्रॅक्टर देण्यात आले. परंतु सात महिन्यांपासून हे ट्रॅक्टर पासिंग करण्यात आलेले नाही.

सात महिन्यांपासून १७ ट्रॅक्टर पासिंगविना
समाजकल्याण व परिवहनचे दुर्लक्ष : बचत गटाने केला ट्रॅक्टर जमा
वर्धा : मागासर्गीय महिला बचत गटासाठी असलेल्या योजनेंतर्गत समाजकल्याणच्या वतीने १७ बचत गटांना ट्रॅक्टर देण्यात आले. परंतु सात महिन्यांपासून हे ट्रॅक्टर पासिंग करण्यात आलेले नाही. शेवटी पुलफैल येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने मिळालेला ट्रॅक्टर समाजकल्याणमध्ये परत केला आणि लवकरात लवकर तो पासिंग करण्याची मागणी सहायक आयुक्त जया राऊत यांना निवेदनाद्वारे केली. तसेच ट्रॅक्टरची चावीही परत केली.
राज्यातील मागासवर्गीय महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीकरिता राज्यशासनाद्वारे अनेक योजना राबविल्या जातात. याच योजनेंतर्गत शासनाद्वारे महिला बचत गटांना ट्रॅक्टर देण्याची योजना आहे. यांतर्गत जिल्ह्यातील पुलफैल येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटासह अन्य १६ बचत गटांना डिसेंबर २0१३ ला ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. पण सात महिन्यापासून यातील एकाही ट्रॅक्टरची परिवहन विभागाच्या वतीने पासिंग करण्यात आलेली नाही. तसेच ट्रॅक्टरचे वाटप करताना अनेक सामानाची कमतरता असल्याचेही बचत गटाच्या सर्व सदस्यांनी अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्त, वर्धा यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत त्याची शहनिशा केली नसल्याचा आरोप निवेदनात सावित्रीबाई फुले बचत गटाच्या अध्यक्षा शारदा झांबरे यांनी केला आहे.
शासनाच्या धोरणानुसार ट्रॅक्टरचे पासिंग करण्याबाबत अनेकदा सहाय्यक आयुकत समाज कल्याण, वर्धा यांना सहकार्य करण्याबाबत लेखी व मौखिक कळविण्यात आले. परंतु त्याची कोणतीही मानसिकता नसल्यामुळे बचत गटाकडे किंवा ट्रॅक्टर वाटप झाल्यानंतर त्याच्या पासिंगचे काय याकडे लक्ष देण्यात आले नसल्याचेही निवेदनात मनूद आहे.
ट्रॅक्टरची पासिंग न झाल्यामुळे कोणतेही काम करता येत नाही. त्यामुळे सदर ट्रॅक्टर एकाच जागेवर खराब होत असल्याने सावित्रीबाई फुले बचत गटाच्या अध्यक्षा शारदा झांबरे यांनी सदर ट्रॅक्टर समाजकल्याण विभागात जमा केला आणि चावीही त्यांना रितसर परत केली. तसेच जोपर्यंत पासिंग होत नाही तोपर्यंत तो परत नेणार नाही अशी भूमिकाही घेतली. यासंदर्भात सहायक आयुक्त यांना विचारणा केली असता आमच्या कडून ट्रॅक्टर पासिंगसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले पण परिवहनचे अधिकारी आपल्याशी उद्धट वागत असल्याचेही त्या म्हणाल्या. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. आर मांजरीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून नो रिस्पॉन्स मिळत होता. (शहर प्रतिनिधी)