वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा साडेसातशे शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:23 PM2020-09-22T12:23:13+5:302020-09-22T12:25:05+5:30

आता परतीच्या पावसाचा धडाका कायम असल्याने शेती जलमय झाली आहे. आठही तालुक्यांमध्ये जवळपास ५०५ हेक्टरवरील पिकांचे या परतीच्या पावसाने नुकसान झाले असून ७६२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

Seven hundred and fifty farmers hit by return rains in Wardha district | वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा साडेसातशे शेतकऱ्यांना फटका

वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा साडेसातशे शेतकऱ्यांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्दे५०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानरोगराईचा प्रादुर्भाव कायमच, आर्थिक घडी विस्कटली

आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना यावर्षी सुरुवातीपासून अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला अतिवृष्टीने, तर आता परतीच्या पावसाचा धडाका कायम असल्याने शेती जलमय झाली आहे. आठही तालुक्यांमध्ये जवळपास ५०५ हेक्टरवरील पिकांचे या परतीच्या पावसाने नुकसान झाले असून ७६२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. यावर्षी निसर्गकोपामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित चांगलेच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे कपाशी तर बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उत्पादकांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. अद्याप वरुणराजाची कृपादृष्टी कायम असल्याने सोयाबीन आणि कपाशीसह इतरही पिके धोक्यात आली आहेत. सप्टेंबरमधील परतीचा पाऊसही दरदिवसालाच धो-धो बरसत असल्याने शेतशिवारात पाणी साचलेले आहे. सोबतच रोगराईनेही डोके वर काढल्याने पिके जळायला लागली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ५०५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज असून प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी असल्याचे चित्र आहे.

एक हजार हेक्टरवर झाली फळगळ
जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा या तालुक्यामध्ये ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात आली आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून या परिसराची ओळख आहे पण, यावर्षी ‘ब्राऊन रॉट’ या बुरशीजन्य रोगाने बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. या तिन्ही तालुक्यातील १ हजार १८७.५० हेक्टरवरील संत्रा, मोसंबीची फळगळ झाली आहे. सध्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

४३ हजार हेक्टरवरील सोयाबीन गेले
सततचा पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे सोयाबीन वाढले पण, झाडाला शेंगांचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये ट्रॅक्टर फिरविला आहे. सोबतच यलो मोझॅक, चक्रीभुंगा, अळी आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यातील ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

निम्न वर्धाचे बॅक वॉटरही शेतकऱ्यांच्या मुळावर
यावर्षी सुरुवातीपासूनच दमदार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील मोठ्या ११ तर लघु व मध्यम २० जलाशये हाऊसफुल्ल झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पही भरला असून या प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे ३५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे ४५४ शेतकरी अडचणीत आले असून त्यांना दरवर्षीच या बॅक वॉटरचा मोठा फटका बसत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

Web Title: Seven hundred and fifty farmers hit by return rains in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती