सात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
By Admin | Updated: September 9, 2014 00:33 IST2014-09-09T00:33:20+5:302014-09-09T00:33:20+5:30
दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. गत ४८ तासांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील सात जलाशय १०० टक्के भरले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे १५ दार उघडण्यात आली.

सात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
वर्धा : दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. गत ४८ तासांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील सात जलाशय १०० टक्के भरले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे १५ दार उघडण्यात आली. यातून २३४ क्यसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी नाले फुगले आहेत. पुलगाव येथे असलेल्या वर्धा नदीवरील लहान पुलावरून पाणी गेल्याने या मार्गाची वाहतूक बंद झाली. यशोदा नदीचे पाणी सरूळ येथील पुलावरून पाणी गेल्याने वर्धा-कापसी-राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. संतधार पावसामुळे देवळी तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. सारवाडी येथे सोमवारी दुपारी एक घर पडल्याने तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
गत २४ तासात जिल्ह्यात ५९३.२० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील देवळी, वर्धा, सेलू व समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. देवळी तालुक्यात १६५ मि.मी पाऊस झाला. वर्धा तालुक्यातही अतिवृष्टी झाली असून ९६.६० मि.मी. पावसाची नोंद झाली. समुद्रपूर तालुक्यात ८० मि.मी. पाऊस, सेलू तालुक्यातही ६७ मि.मी. पाऊस झाला. आर्वी तालुक्यात ३७ मि.मी., आष्टी तालुक्यात ४७.२० मि.मी. आणि कारंजा तालुक्यात ३६.३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात प्रत्यक्ष सरासरी पाऊस ७४.१५ इतका झाला आहे. पावसाच्या हजेरीमुळे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पाची पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील लघु प्रकल्प असलेली कवाडी, सावंगी, लहादेवी, अंबाझरी, पांजरा, बोथली, उमरी जलाशये पूर्णत: भरली आहेत. तसेच आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुऱ्हा, रोठा १ आणि रोठा २, आष्टी, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हरासी ही जलाशयेही पूर्णत: भरलेली असून त्यांच्या सांडव्यावरून प्रवाह सुरू आहे.