सेवाग्राम रुग्णालयाला मिळाली कोविड चाचणीची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:00:41+5:30

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था यांनी १६ मार्चला कोरोना चाचणीची परवानगी मिळण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवला होता. त्याअनुषंगाने भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या संचालक आणि नागपूर एम्सच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक यांनी सेवाग्राम महाविद्यालयातील आवश्यक सुविधांची ऑनलाईन तपासणी केली.

Sevagram Hospital gets permission for Kovid test | सेवाग्राम रुग्णालयाला मिळाली कोविड चाचणीची परवानगी

सेवाग्राम रुग्णालयाला मिळाली कोविड चाचणीची परवानगी

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : नागपूरला स्वॅब पाठविण्याची गरज नाही, झटपट मिळेल अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना चाचणी प्रयोगशाळेची संख्या वाढविण्यात येत आहे. विदर्भात नागपूर, अकोलानंतर आता वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत मिळाली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील सर्व कोरोना चाचणी येथेच करता येणार असून अहवालही झटपट मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली आहे. एकूणच ही वर्धा जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता आहे.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था यांनी १६ मार्चला कोरोना चाचणीची परवानगी मिळण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवला होता. त्याअनुषंगाने भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या संचालक आणि नागपूर एम्सच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक यांनी सेवाग्राम महाविद्यालयातील आवश्यक सुविधांची ऑनलाईन तपासणी केली. चाचणीसाठी मान्यताप्राप्त उपकरणे, आवश्यक कागदपत्रे, भौतिक सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर, कर्मचारी वर्ग याच्या तापसणीसोबतच त्यांना चाचणीसाठी स्त्राव नमुना पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या मानांकणाप्रमाणे १०० टक्के जुळल्यानंतर सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्था कोरोना चाचणी करण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल दिला. आज महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता नितीन गंगणे यांना नागपूर एम्सकडून कोरोना चाचणीसाठी परवानगी मिळाल्याचे पत्र प्राप्त होताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले.

‘एम्स’च्या मार्गदर्शनात होणार चाचणी
आयुर्विज्ञान संस्थेतील एक सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि तीन तंत्रज्ज्ञ यांचे ‘एम्स’ येथे चाचणीसंदर्भात प्रशिक्षण झाले आहे. महाविद्यालयात पूर्वीच बीएसएल-३ प्रयोगशाळा आहे. पूर्वी ही प्रयोगशाळा क्षयरोग कल्चर चाचणीसाठी वापरली जात होती. आता ती कोरोना चाचणी प्रयोगशाळेत रूपांतरित केली आहे. प्रयोगशाळेत उणे २० आणि ८० तापमानावर यासंदर्भातील टेस्टिंग एजंट ठेवण्याची सुविधा आहे. कोरोना चाचणी नागपूर एम्सच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यासाठी टेस्टिंग किट भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेमार्फत पुरविण्यात येणार आहे, असे नितीन गंगणे यांनी सांगितले.

तपासणीची सुविधा वर्धेतच मिळाल्याने मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाचे कार्य करता येईल. जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात फिव्हर क्लिनिकची सुविधा केली आहे. तेथे येणाºया तापाच्या रुग्णांचे स्त्राव आता टेस्टिंगसाठी पाठवता येतील. कुणी संशयित वाटत असेल तर त्याची चाचणी वर्धेतच होणार आहे. शिवाय लवकर अहवाल मिळत उपचार करणे सोयीचे होणार आहे. वर्धा जिल्ह्याला या परवानगीमुळे फायदा होणार आहे.
- विवेक भिमनवार,
जिल्हाधिकारी, वर्धा.

Web Title: Sevagram Hospital gets permission for Kovid test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.