‘भारत छोडो’चा सेवाग्राम आश्रम साक्षीदार

By Admin | Updated: August 9, 2016 01:26 IST2016-08-09T01:26:54+5:302016-08-09T01:26:54+5:30

‘अंग्रेजो भारत छोडो’चा नारा इतिहासात अजरामर आहे. या नाऱ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम आश्रमातच रोवल्या गेली.

Sevagram Ashram witness of 'Quit India' | ‘भारत छोडो’चा सेवाग्राम आश्रम साक्षीदार

‘भारत छोडो’चा सेवाग्राम आश्रम साक्षीदार

आंदोलनाच्या मुहूर्तमेढीचे ७४ वर्षे : अजूनही आठवणी ताज्याच; अनेकांसाठी उर्जास्त्रोत
दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्राम
‘अंग्रेजो भारत छोडो’चा नारा इतिहासात अजरामर आहे. या नाऱ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम आश्रमातच रोवल्या गेली. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने देशाचे उर्जास्त्रोत ठरले. आश्रम आजही तेवढ्याच ताकदीने येथे येणाऱ्यांना उर्जा देत आहे. भारत छोडो ची मुहूर्तमेढ याच आश्रमातून रोवण्यात आली. त्याला मंगळवारी ७४ वर्षे होत आहे. या भारत छोडोचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम क्रांतीची प्रेरणा देत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला विचार देण्याचे कार्य याच आश्रमातून झाले, ते आजही कायम आहे. आजही येथून विचार घेवून जाण्यासाठी अनेक जण येतात. स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या सेवाग्राम आश्रमात कार्यकर्ता निर्माण, विचार आणि चळवळीला दिशा देण्याचे काम झाले होते. याच आश्रमात महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनात कुटीतून भारत छोडोचा मसुदा तयार करून ठराव पारीत झाला. त्या काळापासून येथे होणाऱ्या सभा, बैठकांना ऐतिहासिक अधिष्ठान आहे.
महात्मा गांधी सेवाग्रामला आले त्या काळात देशातील वातावरण त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाने प्रभावित झाले होते. विविध उपक्रम व चळवळीला प्रारंभ झाला होता. १९४० मध्ये व्यक्तिगत सत्याग्रहाची प्रारंभिक तयारी याच आश्रमातून झाली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सरकारशी तीव्र मतभेद झाले. आणि १९४२ मध्ये गांधीजींनी आता इंग्रजांनी भारत सोडलाच पाहिजे, असे आंदोलन पुकारले. या आंदोलनाची पहिली बैठक आदी निवासमध्ये झाली. येथेच भारत छोडोचा मसुदा तयार करून ठराव मंजूर झाला.
या आंदोलनात सहभागी होण्याकरिता जाताना महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि सहकाऱ्यांनी रवाना होण्यापूर्वी आश्रमात बकुळीचे झाड लावले होते. गवालिया टँकवर मोठी सभा झाली. या क्षणापासून देशातील प्रत्येक जणांनी आपण स्वतंत्र्य झालो, असे समजून आपण स्वतंत्र्य भारताचे नागरिक म्हणून वागले पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ‘करा किंवा मराचा’ नारा बापूंनी या सभेत देशवासियांना दिला. गांधीजींचे आवाहन जनतेसाठी स्फूर्तिदायक ठरले.
९ आॅगस्टला भारत छोडोचे जनआंदोलन चिरडून टाकण्यासाठी ब्रिटीशांनी सकाळीच गांधीजी, मौलाना आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या प्रमुख नेत्यांना अटक करून पुण्याच्या आगाखाँ पॅलेसमध्ये ठेवले होते. पण जनआंदोलनाचे नेतृत्व कस्तुरबा आणि सहकाऱ्यांनी सुरूच ठेवले. ९ आॅगस्ट १९४२ हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसाठी महत्त्वाचा ठरला. भारतीय इतिहासात ‘क्रांती दिनाची’ नोंद झाली, पण याचे बीजारोपण मात्र सेवाग्राम आश्रमात झाले असून यंदा त्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे.

Web Title: Sevagram Ashram witness of 'Quit India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.