बंदोबस्तातही पवनार नदी परिसरात पार्ट्या रंगल्याच
By Admin | Updated: January 3, 2016 02:43 IST2016-01-03T02:43:09+5:302016-01-03T02:43:09+5:30
वर्षाचा शेवटचा दिवस ‘थर्टी फस्ट’ म्हणून साजरा करण्याचे फॅड शहरात सगळीकडेच फोफावू लागले आहे. यासाठी एकांत परिसर म्हणून पवनार येथील नदीपात्राला सर्वांची पसंती असते.

बंदोबस्तातही पवनार नदी परिसरात पार्ट्या रंगल्याच
प्लास्टिकचे ग्लासेस व पाणीपाऊचचा खच : धाम नदीपात्राचे पावित्र्य धोक्यात
वर्धा : वर्षाचा शेवटचा दिवस ‘थर्टी फस्ट’ म्हणून साजरा करण्याचे फॅड शहरात सगळीकडेच फोफावू लागले आहे. यासाठी एकांत परिसर म्हणून पवनार येथील नदीपात्राला सर्वांची पसंती असते. यंदा पोलिसांचा पवनार परिसरात तगडा बंदोबस्त होता. असे असतानाही नदीपात्रात सर्वत्र प्लास्टिक ग्लासेस, दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिक पाऊच पाहता थर्टी फस्ट नाही तर ‘हॅपी न्यू इयर’ म्हणत येथे पार्ट्या झडल्याचे निदर्शनास येत आहे.
मद्यपींसाठी पवनार येथील धाम नदीचे पात्र ही आवडती जागा आहे. दारूबंदी असतानाही येथे विनोबांच्याच समाधी स्थळाजवळ वर्षभर दारूचे दर्दी आपली गर्दी करतात. महत्प्रयासाने गावात पोलीस चौकी निर्माण झाली, पण याचा मद्यपींवर कुठलाही वचक बसला नसल्याचे दिसते. सायंकाळ होतात नदीच्या दोन्ही काठावर मद्यपींचा हैदोस असतो. ३१ डिसेंबरलाही येथे पार्ट्या झडणार हे गृहित धरून अनुचित प्रकार टाळण्याकरिता सेवाग्राम पोलिसांनी येथे तगडा बंदोबस्त ठेवला होता. परिणामी काही दिवस तरी येथे मद्यपी झिंगणार नाही असा समज होता. हा समज मोडीत काढत थर्टी फस्ट नाही तर नव्या वर्षाचे स्वागत करीत नववर्र्षाच्या पहिल्या दिवशी येथे पार्र्ट्या झडल्याच्या ताज्या खाणाखुणा पहावयास मिळतात. सर्वत्र प्लास्टिकचे ग्लासेस आणि त्यात उरलेली थोडीशी दारू आत्ताच हा प्रकार घडल्याचे सांगते. त्यामुळे केवळ एक दिवस बंदोबस्त ठेवण्याचा फायदा काय असा प्रश्न येथे फिरावयास येणारे नागरिक व्यक्त करतात. मद्यपींमुळे येथील पात्र दूषित होत आहे. दर रविवारी येथे होणारे स्वच्छता अभियान सध्या बासणात गुंडाळले आहे. ग्रामपंचायतचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.(शहर प्रतिनिधी)