जिल्हा रुग्णालयातील सेवाच ‘व्हॅटिलेटर’च्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST2021-04-04T05:00:00+5:302021-04-04T05:00:15+5:30
कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण याच कामाच्या ओघात त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना असह्य असा किडनी स्टोनचा त्रास जानवू लागल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयातील सेवाच ‘व्हॅटिलेटर’च्या उंबरठ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू आणि गरिबांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवाच सध्या व्हॅटिलेटरच्या उंबरठ्यावर आली आहे. विशेष म्हणजे कासवगतीने का होई ना पण कोविड-१९ हा विषाणू या रुग्णालयातील तज्ज्ञांना सध्या आपल्या कवेत घेत आहे. रुग्णालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा शल्य चिकित्सकांनी वेळीच पर्यायी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. तशी कुजबूज सध्या या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण याच कामाच्या ओघात त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना असह्य असा किडनी स्टोनचा त्रास जानवू लागल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर बालरोग तज्ज्ञ डॉ. अमोल येळणे, नेत्र तज्ज्ञ रंजना वाढवे, डॉ. संजय दाडे यांना कोविड संसर्ग झाल्याने ते सध्या गृहअलगीकरणात आहेत. तर कोविड बाधिताच्या निकट संपर्कात आल्याने प्रसुती तज्ज्ञ डॉ. मनिषा नासरे या सध्या गृहविलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे त्यांची ॲन्टिजेन किटद्वारे केलेल्या कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आरटीपीसीआर पद्धतीने केलेल्या कोविड चाचणीचा अहवाल अद्यापही आरोग्य विभागाला प्राप्त झालेला नाही. हळूहळू का होई ना पण कोविड विषाणू सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या कवेत घेत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड ब्लॉस्ट होण्यापूर्वी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणी दबक्या आवाजात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली केली जात आहे.
अनेकांनी केली कोविडवर मात
जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी बहूतांश अधिकारी व कर्मचारी कोविडवर विजय मिळवित कर्तव्यावर रुजू झाले आहे.