वर्धा-हिंगणघाट मार्गावर खड्ड्यांची मालिका
By Admin | Updated: August 5, 2016 02:05 IST2016-08-05T02:05:23+5:302016-08-05T02:05:23+5:30
वर्धा ते हिंगणघाट मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग आता प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

वर्धा-हिंगणघाट मार्गावर खड्ड्यांची मालिका
अपघाताचा धोका : वाहनधारकांना करावी लागते कसरत
हिंगणघाट : वर्धा ते हिंगणघाट मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग आता प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. मार्गावरील मोठमोठे खड्डे चुकविताना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहन चालक व प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
हिंगणघाट ते वर्धा या रस्त्याचे पाच वर्षांपूर्वी नव्याने बांधकाम केले होते. तसेच मागील वर्षी रस्त्याची डागडुजी केली. मात्र या रस्त्याची आता दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: खराब झाला असून जागोजागी असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे. खड्ड्यांपासून वाहन काढताना अनेकांची तारांबळ उडते. अनेकदा वाहन चालकांना खड्डे चुकविण्याचा प्रयत्नात अपघाताचा धोका असतो. खड्ड्यातून होणारी ही वाहतूक अधिक धोकादायक झाली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे.
काही भागातील गिट्टी उघडी पडली आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरलेले असतात. खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता असते. जिल्हा कार्यालयाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. कामानिमित्त शेकडो लोक ये-जा करतात. जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याची खंतही व्यक्त होते. यवतमाळ, अमरावतीकडे जाण्यासाठी हिंगणघाटकरांना हाच रस्ता आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
कोरा-हिंगणघाट मार्ग ठरतो जीवघेणा
कोरा : हिंगणघाट ते कोरा मार्गावरील कडजना येथील पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक अत्यंत धोकादयक ठरत आहे. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या पुलाचे उन्हाळ्यातच काम पूर्ण होणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केले. पावसाळ्यापासून रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहन धारकांना जाम मार्गे जवे लागत आहे. येथून वाहन काढताना चिखलात वाहन रुतत असल्याने वाहन धारकांना नाहक मनस्ताप होतो. शिवाय अपघाताचा धोका असतो.
या मार्गावर जडवाहन फसण्याचा धोका आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. याला जबाबदार असलेल्या घटकांवर कार्यवाहीची मागणी होत आहे. पुलाचे व रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)