रामनगर परिसरात मृत अर्भकामुळे खळबळ
By Admin | Updated: January 15, 2016 02:50 IST2016-01-15T02:50:55+5:302016-01-15T02:50:55+5:30
रामनगर येथील जैन मंदिराच्या परिसरातील एका मोकळ्या भुखंडात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळलेल्या मृत अर्भकामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली.

रामनगर परिसरात मृत अर्भकामुळे खळबळ
श्वान व वराहांच्या कळपामुळे घटना उघड
वर्धा: रामनगर येथील जैन मंदिराच्या परिसरातील एका मोकळ्या भुखंडात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळलेल्या मृत अर्भकामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली. अर्भक कुजलेल्या स्थितीत असल्याने ते किती दिवसांपूर्वीचे होते या संदर्भात तपास सुरू आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाली. घटनास्रूथळ रामनगर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी पाहणी केली असता सदर अर्भक पुलिंगी असल्याचे समोर आले.
येथील एसटी डेपो मार्गलगत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर श्वान व वराहांच्या कळपात झुंज सुरु होती. तेथून जात असलेल्या एका इसमाने श्वानांना हाकलून घटनास्थळाकडे दृष्टी फिरविल्यास त्याला येथे एक अर्भक मृतावस्थेत असल्याचे दिसले. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी करून अर्भक ताब्यात घेतले. ते उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे कृत्य कोणाचे याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून संगण्यात आले आहे.
सदर अर्भक कुजलेल्या अवस्थेत असल्याने ते एका दिवसाचे नसून काही दिवसांपूर्वीचे असावे असा संशय पोलिसांच्यावतीने करण्यात आला आहे. हे अर्भक येथे टाकण्यात आले नसून ते श्वानांनी दुसऱ्या ठिकाणावरून उचलून आणले असावे, असाही संशय आहे. घटना उघड होताच ती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. पाहाता पाहता घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान घटनास्थळी रामनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी चमुसह घटनास्थळ गाठात ते अर्र्भक ताब्यात घेतले. प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
या प्रकरणी येथील नगरसेविका योगिता इंगळे यांचे पती संजय इंगळे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी अज्ञात महिलेविरूद्ध भादंविच्या कलम ३१८ कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. हे कृत्य कोणाचे या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांची चमू तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)