बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:32 IST2018-06-28T23:31:49+5:302018-06-28T23:32:55+5:30
सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांसह बॉम्ब शोध पथकाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून सदर साहित्य ताब्यात घेतले.

बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांसह बॉम्ब शोध पथकाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून सदर साहित्य ताब्यात घेतले.
जि.प. कार्यालयाच्या परिसरात एका प्लास्टिकच्या डब्यात काही इेलक्ट्रीक साहित्य व त्याला हिरवे व लाल रंगाचे वायर जोडून असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. सदर साहित्य बॉम्ब तर नाही ना, अशी शंका उपस्थित करीत घटनास्थळी जमा झालेल्या बघ्यांच्या गर्दीतील काही सुजाण नागरिकांनी याबाबत त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलीस नियंत्रण कक्षात कर्तव्यावर असलेल्या एएसआय दिलीप हजबे यांनी सदर माहिती तात्काळ बॉम्ब शोध पथकाला दिली. माहिती मिळताच सदर पथकाने घटनास्थळ गाठून मोठ्या सतर्कतेने सदर साहित्य आपल्या ताब्यात घेतले. बॉम्बसदृश साहित्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चिप, बॅटरी, एलईडी लाईट, टॅक्टीकल स्विच, वायर आदींचा समावेश होता.
सदर साहित्य जप्त केले आहे. प्रथमदर्शी ते बॉम्बसदृश वाटत असले तरी बारकारईने पाहिल्यास त्यात कुठलेही स्फोटक आढळले नाही. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने एखादा प्रकल्प तयार केला असावा. ते नियोजित स्थळी नेताना वाटेत नकळत पडले असावे. ते बॉम्ब नाही.
- हेमंत बावणे, सहायक पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोध पथक, वर्धा.