सेलू तालुका क्रीडांगण सदोष
By Admin | Updated: October 12, 2015 02:20 IST2015-10-12T02:20:51+5:302015-10-12T02:20:51+5:30
ग्रामीण भागातून गुणवंत खेळाडू तयार व्हावे याकरिता शासनाकडून विविध प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यात येतात.

सेलू तालुका क्रीडांगण सदोष
उद्देशाला हरताळ : बांधकाम विभागाला बजावली नोटीस
श्रेया केने वर्धा
ग्रामीण भागातून गुणवंत खेळाडू तयार व्हावे याकरिता शासनाकडून विविध प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यात येतात. परंतु प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या अंमलबजावणीत कुचराई होत असल्याने उद्देशालाच हरताळ फासल्याचे सेलू येथे उजेडात आले आहे. सेलूच्या तालुका क्रीडा संकुलातील मैदानाचे बांधकाम सदोष पद्धतीने झाल्याचे पाहणीत दिसून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुलाचे केवळ देवळी, सेलू तालुक्यातील बांधकाम पूर्ण झाले आहे तर इतर ठिकाणी काम सुरू आहे. जिल्ह्यातील क्रीडा संकुलाचे बांधकाम व देखभाल करण्याकरिता राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे.
क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. क्रीडा संकुलातील धावपट्टी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो ही मैदाने बांधताना ते अंतरानुसार बनविण्यात आलेले नाही. यापूर्वी आमदार, जिल्हाधिकारी यांनी मैदानांची पाहणी करताना नियमानुसार मैदानाचे बांधकाम केली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. तसेच बांधकाम विभागाला सदर मैदानाचे बांधकाम मोजमापात करावे असे निर्देश दिले होते. यानंतरच संकुल हस्तांतरित करण्याचे पत्र देण्यात आले. संकुलाचे हस्तांतरण करण्यापूर्वी विभागीय उपसंचलक व क्रीडा अधिकारी यांनी पुनर्पाहणी केली असता मैदान तयार करताना कोणत्याच सुधारणा केल्या नसल्याचे समोर आले.
मैदानाच्या अंतराचे मोजमाप केले असता नियोजित क्षेत्रफळ आणि अंतरापेक्षा तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारच्या मैदानावर खेळाचे प्रदर्शन केल्यास खेळाडूंच्या कामगिरीवर याचा निश्चितच विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून सूचनांचे पालन होते अथवा नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखविली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.