धुऱ्यावरील झाडांची शेतकऱ्यांकडून विक्री
By Admin | Updated: February 29, 2016 01:46 IST2016-02-29T01:46:11+5:302016-02-29T01:46:11+5:30
नापिकीने शेतकरी खचला आहे. धुऱ्यावरचे वृक्ष विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

धुऱ्यावरील झाडांची शेतकऱ्यांकडून विक्री
शेतसीमा संकटात : रस्त्यावरील झाडांची कत्तल
अनिल रिठे (श्या.पं.)
नापिकीने शेतकरी खचला आहे. धुऱ्यावरचे वृक्ष विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे आगामी काळात शेताचे धुरेही संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात वृक्षकटाईची मोहीम सुरू आहे. मोठ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्याच्या नावाने वृक्षकटाई केली जात आहे. याकडे महसूल, वन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसते.
चिस्तुर ते भारसवाडा, किन्हाळा ते अंतोरा, खंबीत, बेलोरा यासह परिसरातील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेली मोठी झाडे खोडासह बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे. शेतातील अनेक धुऱ्यांचीही तशीच अवस्था आहे. प्रथम झाडांच्या फांद्या कापण्यात येतात वा साल काढली जाते. काही वेळेला खोडाला छिद्र करून त्यात विस्तव वा चुना, सल्फेट टाकण्यात येते. काही दिवसांनी ती झाडे वाळून जातात. यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करीत ती झाडे कापली जातात. शेतकरी आपल्या शेताच्या धुरऱ्यावर असलेली एक-दोन झाडे संबंधित कंत्राटदाराला विकतात. सदर कंत्राटदार शेताजवळील रस्त्यालगतची झाडे संबंधित अधिकाऱ्याला चिरीमिरी देऊन कापून काढतात. झाडांची कत्तल करण्याची ही मोहीम आष्टी तालुक्यात सुरू झाली आहे.
सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली. संत्रा गळाला, नापिकीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रानकटाई मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आष्टी, धाडी, सारवाडी, आर्वी येथील काही आरामशीनवर बाभूळ तसेच आडजात लाकडांचे ढीग आहेत. याकडे वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
शेतकऱ्यांनी आर्थिक टंचाई भागविण्यासाठी शेताच्या धुऱ्यावरील वृक्ष विकण्याचा सपाटा लावला आहे. यात बाभूळ, कडूनिंब, आंबा आदी वृक्षांचा समावेश आहे. आनंदवाडी ते खंबीत बेलोरा या मार्गावरील काही शेतातील बाभळी कंत्राटरारांनी विकत घेतल्या. कोणत्याही महसूल वा अन्य कोणत्याही विभागाची परवानगी न घेता शेतातील वृक्ष कापले. सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देत शेताजवळील रस्त्याच्या हद्दीत येत असलेली बाभळीची झाडेही कटर मशीनद्वारे कापली. प्रत्येक रस्त्यावर अशीच वृक्षकटाई सुरू राहिली तर रस्ते उजाड झाल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळी शेतीच्या धुऱ्यावर आंबा, बोर, सीताफळे आदी झाडे दिसत होती. ती इतिहासजमा झालीत. धुऱ्यावरील झाडांमुळे शेताची सीमा बांधली जात होती.
शेतकऱ्यांत वादही होत नव्हते. शिवाय वृक्षांमुळे सुपिकता कायम राहत होती; पण ही झाडे कापली जात असल्याने धुरा नष्ट होत वादाला तोंड फुटल्याचे दिसते.
पक्षी व प्राण्यांचे जीवनही धोक्यात
पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्ची घालत आहे. नेमके या विरूद्ध काम तालुक्यात सुरू आहे. प्रत्येक रस्त्यावरील वृद्वांची कत्तल केली जात आहे. धुऱ्यावरील वृक्षही कापले जात असल्याने धुरे नष्ट होत वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय वृक्षतोडीमुळे पक्ष्यांना घरटे राहणार नाही. ही कत्तल अशीच सुरू राहिली तर काही वर्षांनी झाडेच राहणार नाही. परिणामी, पशु-पक्षीही धोक्यात येण्याची शक्यता आहे.