अत्यल्प दरात कापूस विक्री
By Admin | Updated: January 24, 2015 01:41 IST2015-01-24T01:41:28+5:302015-01-24T01:41:28+5:30
शेतकरी केवळ आशेवर जगतो हे वाक्य नेहमीच ऐकावयास मिळते. तो आशेवर असता तरी त्याच्य पदरी नेहमी निराशाच येणे ही काळ्या दगडावरची रेघ, असं विसंगत चित्रही नेहमीचच.

अत्यल्प दरात कापूस विक्री
दिलीप चव्हाण सेवाग्राम
शेतकरी केवळ आशेवर जगतो हे वाक्य नेहमीच ऐकावयास मिळते. तो आशेवर असता तरी त्याच्य पदरी नेहमी निराशाच येणे ही काळ्या दगडावरची रेघ, असं विसंगत चित्रही नेहमीचच. त्यामुळे कापसाचे भाव वाढेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपत आली आहे. भाव वाढण्याचे कुठलेही संकेत दिसत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी न परवडणाऱ्या भावात कापूस विकायला सुरुवात केली. ३ हजार ८५० रुपये प्रती क्विंटल भावाने अखेर शेतकरी आपला सांभाळून ठेवलेला कापूस विकत असतानाचे चित्र सेवाग्राम पंचक्रोशीत दिसत आहे.
एकेकाळी विदर्भाचे पांढरे सोने म्हणून ओळख असणारी कापसाची ओळख आता काळवंडत आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे कवडीमोल भावाने कापूस विकला जात आहे. सोन्याचा भाव सदैव तेजीत असतो. कधी काळी थोडा फार चढउतार असला तरी सोने नेहमीच तेजीत असते. परंतु विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याबाबत आज मात्र असे दिसत नाही.
विदर्भातील कित्येक कास्तकारांनी पांढऱ्या सोन्यावरच आतापर्यंत आपले भविष्य घडविलेले आहे. अनेकांच्या यशोगाथा प्रेरक ठरल्या आहेत; परंतु गत काही वर्षात हे पांढरे सोने मातीमोल भावात विकले जात आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा, कौटुंबिक कार्य, घर बांधणी आणि विवाह इत्यादी कार्य कुटुंब प्रमुखांना कापसाच्या भरोश्यावर पार पाडणे कठीण जात आहे. नवीन बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशके यांची भाववाढ तसेच त्याच्या अती वापरामुळे शेतीचे व्यवस्थापन बिघडले. खर्चाच्या तुलनेत भावात वाढ झाली नसल्याने कापूस उत्पादक संकटात सापडला. यात भर पडली ती नैसर्गिक संकटाची पण कापूस उत्पादन दरवर्षी कमी होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. या वर्षाला सामान्यपणे कोरडवाहू दीड ते दोन तर ओलती चार क्विंटल प्रती एकर असा राहिला आहे. ३ हजार ८५० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला असला तरी यात गाडीभाडे प्रति क्विंटल शंभर रुपये भराई व गाडी खाली करणे प्रती क्विंटल वीस रुपये असा खर्च वजा जाता प्रती क्विंटल ३ हजार ७३० रुपये असा शेतकऱ्यांच्या पदरी भाव पडला. यात त्यांच्या परिश्रमाचे मुल्यच कुठे धरल्या गेले नाही. कापसाच्या उत्पादनाने शेतकरी हतबल झाला. शासन मदतीचा अद्यापही पत्ता नाही. जगायचे की कर्ज फेडायचे हा एकच प्रश्न आता मानगुटीवर बसला असून सरकारापासून अशा व्यर्थ ठरत आहे. दहा हजार रुपयांच्या दराची मागणी पण अर्धा भावही पदरी नसल्यामुळे अखेर आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी कापूस विकायला लागला आहे.