Sell cotton at CCI at a base rate | आधारभूत दराने सीसीआयला कापूस विक्री करा
आधारभूत दराने सीसीआयला कापूस विक्री करा

ठळक मुद्देसुधीर कोठारी : बाजार समितीत आयोजित पत्रकार परिषदेत केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापसाची विक्री न करता सीसीआयला आधारभूत दराने कापसाची विक्री करावी. तसेच बाजार समितीने शेतकरी, वाहनचालक व वाहनमालकांकरिता सुरू केलेल्या १ कोटी ११ लाखांच्या भाग्यशाली इनामी योजनेतसुद्धा समिती आवारात शेतमालाची विक्री करून सहभागी व्हावे. ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन हा शेतमाल सद्यस्थितीत विक्री करायचा नाही; मात्र, घरी साठवणुकीकरिता सुविधा नाही व पैशाची आवश्यकता आहे, अशा शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भारतीय कापूस निगम (सीसीआय) द्वारे ८ ते १२ टक्के आर्द्रतेच्या अटीवर ५ हजार ५५० ते ५ हजार ३२८/- या दराने कापसाच्या खरेदीची सुरुवात केली आहे.
सीसीआयद्वारा ८ टक्के आर्द्रता असलेला कापूस ५ हजार ५५० प्रती क्विंटल या दराने खरेदी करण्यात येत असून जास्तीत जास्त १२ टक्के आद्रता असलेला कापूस स्वीकारण्यात येत आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात नाही. ८ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असणाऱ्या कापसाची खरेदी आर्द्रतेच्या टक्केवारीच्या प्रमाणात दरामध्ये कपात करून अधिकाधिक १२ टक्के आर्द्रतेच्या कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सुकलेला मालच विक्रीकरिता आणण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, सीसीआयला कापूस विक्रीच्या वेळेस शेतकऱ्याकडे सुरू वर्षाचा सात-बारा, आयएफएससी कोड व खाते नंबर असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे व माहिती आवश्यक आहे. सीसीआयकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसभापती हरीश वडतकर, संचालक मधुकर डंभारे, मधुसूदन हरणे, शेषकुमार येरलेकर, उत्तमराव भोयर, ओमप्रकाश डालिया, विनोद वानखेडे, अशोक उपासे, राजेश मंगेकर, राजेश कोचर, सुरेश सातोकर, बळीराम नासर, बापूराव महाजन, सुरेश वैद्य, पंकज कोचर, संजय तपासे, संजय जैन, संजय कातरे, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे व सचिव टी.सी.चांभारे व मोठ्या संख्येने शेतकरी व्यापारी, अडते, वाहनचालक उपस्थित होते.

सीसीआयद्वारा ८ टक्के आर्द्रता असलेला कापूस ५ हजार ५५० प्रती क्विंटल या दराने खरेदी करण्यात येत १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात नाही. ८ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असणाऱ्या कापसाची खरेदी आर्द्रतेच्या टक्केवारीच्या प्रमाणात दरामध्ये कपात करून अधिकाधिक १२ टक्के आर्द्रतेच्या कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सुकलेला मालच विक्रीकरिता आणण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी
-अ‍ॅड. सुधीर कोठारी
सभापती, कृउबास, हिंगणघाट

Web Title: Sell cotton at CCI at a base rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.