सोयाबीनच्या शेंगांना अंकुर; शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2015 02:49 IST2015-09-25T02:49:42+5:302015-09-25T02:49:42+5:30
शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपण्याची नावच घेत नसल्याची प्रचिती सध्या येत आहे.

सोयाबीनच्या शेंगांना अंकुर; शेतकरी संकटात
उत्पन्नात येणार घट : कापूस व सोयाबीन पिकासाठी कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना
सेलू : शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपण्याची नावच घेत नसल्याची प्रचिती सध्या येत आहे. सोयाबीन, कपाशी पिकांवर अनेक रोग येत असतानाच आता तालुक्यात अनेक शेतांत सोयाबीनच्या शेंगांना अंकूर फुटले आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सरसावले आहे; पण सोयाबीनच्या शेंगांना अंकूर फुटल्याने उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी व अन्य संकटांमुळे आधीच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यात खरीपातील पिकांवर नवनवीन संकटे येऊ लागली आहेत. यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. सोयाबीनवर काही भागात ‘येलो मोझॅक’ हा रोग आला होता. यावर कृषी विभागाने उपाययोजना सूचविल्या. यातून वाचलेल्या पिकांना आता चुकीच्या वेळी आलेल्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस आल्याने शेंगांना अंकूर फुटत असल्याचे दिसून येत आहे. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहिले वा पाऊस आल्यास सोयाबीनच्या उत्पन्नात अर्ध्यापेक्षा जास्त घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)