सुरक्षा रक्षकाला मारहाणप्रकरणी कामबंद आंदोलन
By Admin | Updated: October 14, 2016 02:45 IST2016-10-14T02:45:31+5:302016-10-14T02:45:31+5:30
येथील कस्तुरबा रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला डॉक्टरने जबर मारहाण केल्याचा आरोप येथील सुरक्षा रक्षकाने केला आहे.

सुरक्षा रक्षकाला मारहाणप्रकरणी कामबंद आंदोलन
कस्तुरबा रूग्णालयातील प्रकार : डॉक्टरांना अटक करण्याची मागणी
सेवाग्राम : येथील कस्तुरबा रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला डॉक्टरने जबर मारहाण केल्याचा आरोप येथील सुरक्षा रक्षकाने केला आहे. याची तक्रार देवूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे येथील सुरक्षारक्षकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
सुरक्षा रक्षक सचिन कांबळे हा १० आॅक्टोबर रोजी कर्तव्यावर होता. सायंकाळी शल्यक्रिया विभागाचे डॉ. अमीतकुमारसिंग मिश्रा यांनी त्यांच्यापर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. यात ते जखमी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात भरती करून उपचार सुरू करण्यात आला. त्या पोलिसांनी व संस्थांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने सुरक्षा रक्षकांनी कामबंद आंदोलन सुरू केले.
महात्मा गांधी आरोग्य संस्थेचे सचिव डॉ.बी.एस. गर्ग यांना निवेदन दिले. यात जखमी कांबळेवर मोफत उपचार करणे, रूजू होईपर्यंत पगार देण्यात यावा, डॉ. नम्रता व डॉ. सुशिल कुमार यांनी केलेले आरोप मागे घेण्यात यावे आणि आंदोलनकर्त्यांचे आंदोलन काळातील वेतन द्यावे, अशा मागण्या निवेदनातूर केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून भादंविच्या कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला मात्र त्यांच्याकडून कारवाईकरिता चालढकल होत आहे. यातील डॉक्टरला अटक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.(वार्ताहर)