अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा टप्पा अप्राप्तच
By Admin | Updated: June 20, 2015 02:27 IST2015-06-20T02:27:49+5:302015-06-20T02:27:49+5:30
जानेवारी १५ ते मार्च २०१५ दरम्यान महाराष्ट्रात वादळी पाऊस, अतिवृष्टी व गारपिटीने थैमान घातले होते.

अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा टप्पा अप्राप्तच
रोहणा : जानेवारी १५ ते मार्च २०१५ दरम्यान महाराष्ट्रात वादळी पाऊस, अतिवृष्टी व गारपिटीने थैमान घातले होते. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने अनुदानाची ४० टक्के रक्कम पीडितांना वाटली पण अनुदानाचा ६० टक्क्याचा दुसरा टप्पा खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान केव्हा मिळणार, असा प्रश्न जिल्हातील शेतकरी उपस्थित करीत आहे.
जानेवारी ते मार्च २०१५ या काळात महाराष्ट्रासह जिल्ह्यात वादळी पावसाने तसेच गारपिटीने मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांचे खरीप व व रबी पिकांसह संत्रा, पपई व भाजीपाले पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल तयार केला. केंद्र शासनाच्या चमूने देखील नुकसानीचा आढावा घेतला.
राज्यशासनाने पाच हजार कोटी पैकी पहिल्या टप्प्यातील दोन हजार कोटीचे म्हणजेच ४० टक्के निधीचे वितरण केले. उर्वरित ६० टक्क्याचा दूसरा हप्ता लवकरच नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते. परंतु ते आश्वासनही हवेतच विरले.
तीन महिन्यांचा काळ लोटला पण शासनाने याबाबत कोणतीच तरतूद केली नाही. लोकप्रतिनिधींनी देखील याची आठवण शासनाला करून दिली नाही, अशी तक्रार शेतकरी वारंवार करीत आहे.
आता खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यात उदासिन आहे. त्यांच्या दृष्टीने शेतकरी हा घटक काळ्या यादी आहे. शेतकरी बी-बियाणे व खते यांची जुळवणी करताना डबघाईस आला आहे. त्यामुळे शासनाने देऊ केलेल्या अतिवृष्टी अनुदानाचा ६० टक्क्याचा दुसरा हप्ता त्वरित वितरित करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)