सेलूला एमआयडीसीची मागणी
By Admin | Updated: October 26, 2014 22:44 IST2014-10-26T22:44:51+5:302014-10-26T22:44:51+5:30
येथे एमआयडीसी व्हावी ही अनेक दिवसांपासूनची मागणी राजकीय मंडळीच्या दुर्लक्षितपणामुळे तशीच पडून आहे. हाताला काम नसलेली बेरोजगारांची फौज येथे रिकामी पडून आहे. रिकाम्या डोक्याला काम

सेलूला एमआयडीसीची मागणी
तरुण होताहेत बेरोजगार : जिल्ह्यातील पुढाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष
सेलू : येथे एमआयडीसी व्हावी ही अनेक दिवसांपासूनची मागणी राजकीय मंडळीच्या दुर्लक्षितपणामुळे तशीच पडून आहे. हाताला काम नसलेली बेरोजगारांची फौज येथे रिकामी पडून आहे. रिकाम्या डोक्याला काम नसल्याने गैर व्यवसायाकडे ते वळत असल्याचे समोर येत आहे.
सेलू रोड रेल्वे स्टेशन रस्त्यावर एमआयडीससीसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्या मार्गावर सद्या जिनींग प्रेसींग, आयटीआय कॉलेज आहे. या भागात एमआयडीसीसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध आहे. देवळी सारख्या ठिकाणी एमआयडीसी होवू शकते, मात्र सेलूला तसे करण्याची राजकीय मानसिकता कुणातही दिसत नाही.
तालुक्यात केळीचे अमापपीक व्हायचे; मात्र त्यावर प्रक्रिया करणारा उद्योग येथे जन्माला आला नाही. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षात घेता येथे चांगले मोठे उद्योग येवू शकतात. रेल्वेस्टेशन सुद्धा हाकेच्या अंतरावर असून उपराजधानी नागपूर केवळ ६० कि़मी. अंतरावर आहे.
काही वर्षांपूर्वी स्वर्गीय प्रभा राव तथा तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी याबाबत प्रयत्न करण्याबाबत जाहीर केले होते. मात्र दोघांच्याही प्रयत्नाला यश आले नाही. आता दूरदृष्टी असलेला पंतप्रधान देशाला आहे. राज्यातही सत्ता येवू पाहते, अशा स्थितीत या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाय रोवण्याची गरज आहे.
औद्योगिक कामासाठी लागणारे इंजिनिअर व इतर आवश्यक कर्मचारी मोठ्या प्रमाणात एमआयडीसीची वाट पाहत आहेत. येथे एमआयडीसी झाल्यास अनेक लहान मोठे उद्योगही सुरू होईल. त्यामुळे बेरांजगारांची समस्या कमी होईल. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी तालुकावासियांची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)