आगीमुळे कंटेनर होताहेत भंगार
By Admin | Updated: November 8, 2014 01:37 IST2014-11-08T01:37:27+5:302014-11-08T01:37:27+5:30
कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेने वस्तीने कंटेनर ठेवण्यात आले आहे.

आगीमुळे कंटेनर होताहेत भंगार
वर्धा : कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेने वस्तीने कंटेनर ठेवण्यात आले आहे. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच आग लावली जाते. या कारणाने शहर परिसरातील सर्वच कंटेनर भंगार झाले आहेत़ तसेच हा ही आग अनेक दिवस सुरू रहात असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून श्वसनाचे आजार वाढले आहेत़
शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेचे वतीने ठिकठिकाणी कंटेनर ठेवले आहेत. स्वच्छता कर्मचारीही या कामासाठी नेमले आहेत. काही नागरिक कचरा कंटेनरमध्ये जमा करतात तर अनेक जण कंटेनरच्या बाजूलाच कचरा फेकण्यात धन्यता मानतात. भरलेल्या कंटेनरमधील कचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असतानाही अनेकदा या कंटेनरमध्येच आग लावण्यात येते. हा प्रकार शहरातील बहुतेक ठिकाणी होत असल्याने जवळपास सर्वच कंटेनरला दिलेला पिवळा रंग जळून कंटेनर जंगून भंगार होत चालले आहे. त्यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत असतानाही याकडे दुर्र्लक्ष होत आहे.
शहरी कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे राहते़ प्लास्टिकचा कचऱ्याचे विघटन होत नाही़ त्याचबरोबर प्लास्टिक जळाल्यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते़ त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांचा प्लास्टिक जाळण्यालाही विरोध आहे़ कंटेनरच्या चारही बाजुला घरे राहतात़ अशा स्थितीत आगीचा धूर सभोवतालच्या परिसरामध्ये पसरतो़ अनेक वेळा प्रचंड धुरामुळे श्वास घेणे कठीण होऊन बसते़ प्लास्टिकसारख्या घातक पदार्थ्यांच्या जळण्यामुळे निर्माण झालेल्या धुरातून श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे नागरिक ही आग आम्ही लावत नसल्याचे गळा ओरडून सांगत प्रशासनाकडे बोट दाखवतात तर परिषदेचे कर्मचारी नागरिकांकडे बोट राखवितात. त्यामुळे आग लावणारा नेमका कोण, हे कळायला मार्ग नाही़
कंटेनरच्या आसपासच्या घरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याने आग लावणाऱ्यावर नगर परिषद प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे़ नगर परिषद प्रशासनाने काही वर्षाम्पूर्वी कंटेनर खरेदी करण्यात आले. प्रत्येक कंटेनर जवळपास १० हजार रूपयांचा असून त्याचे किमान आयुष्य आठ वर्ष आहे़ मात्र आग लावण्याच्या प्रकारामुळे एक वर्षातच सदर कंटेनर भंगार झाले आहेत़ भंगार कंटेनर व्यवस्थित उचलला जात नसल्याने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागत आहे़ लावलेली आग अनेक दिवस तशीच सुरू राहते. अशा वेळी अन्नाच्या शोधात कुत्रे, बकरी अशी जनावरे त्यात पडल्यास जीवानिशी जातात. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.