भंगार बसेस प्रवाश्यांच्या सेवेत
By Admin | Updated: April 9, 2016 02:16 IST2016-04-09T02:16:52+5:302016-04-09T02:16:52+5:30
वर्धा-काटोल मार्गावर धावणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस भंगार झाल्या आहे. दोन दिवसांपूर्वी ही बस लादगड जंगल परिसरात बंद पडली होती.

भंगार बसेस प्रवाश्यांच्या सेवेत
वर्धा-काटोल बस : रस्त्यातच बसेस बंद पडल्याने प्रवाशांची पायपीट
आकोली : वर्धा-काटोल मार्गावर धावणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस भंगार झाल्या आहे. दोन दिवसांपूर्वी ही बस लादगड जंगल परिसरात बंद पडली होती. यानंतर शुक्रवारी येळाकेळी येथील आमराई परिसरात बस बंद पडल्याने प्रवाश्यांना भर उन्हात बसला धक्का मारावा लागला. यानंतरही ही बस सुरू न झाल्याने बसमधील प्रवासी उन्हाचे चटके सोसत रस्त्याच्या कडेला दुसऱ्या बसकरिता ताटकळत होते.
एकीकडे सूर्य आग ओकत असतानाही प्रवाश्यांना बसखाली उतरून पायपीट करावी लागली. गुडीपाडवा असल्यामुळे बसमधील बहुतांश प्रवाश्यांना आपल्या मुळगावी जायचे होते. सलग सुट्टी असल्यामुळे अनेकांनी गावाला जाण्याचा बेत आखला होता. कुटुंबीयांसह बसने प्रवास करीत असताना बस मध्येच बंद पडली. सण साजरा करण्याच्या हेतुने वर्धा-काटोल बस एमएच ४० ८९९५ बसने निघालेल्या प्रवाश़्यांची मात्र चागलीच ताटकळ झाली.
परिवहन विभागातील भंगार बस प्रवाश्यांच्या सेवेत असल्याने याचा नाहक त्रास सर्वसामान्य प्रवाश्यांना सोसावा लागतो. शुक्रवारी हाच प्रत्यय काटोल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आला. येळाकेळी आमराईत बस नादुरुस्त झाली तेव्हा यात बालके, महिला व वयोवृद्ध मंडळी होती. जिथे बस बंद पडली तिथे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने या प्रवाश्यांचे हाल झाले. एक तासाच्या अवधीनंतर दुसरी बस तिथे पोहचल्यावर प्रवाश्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यावर बराच वेळपर्यंत येथे तांत्रिक विभागातील कर्मचारी पोहचले नव्हते. प्रवाश्यांनी तक्रार करुनही परिवहन विभागाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष केले. काटोल-वर्धा मार्गावर नादुरूस्त स्थितीतील बसेस देऊ नये अशी माग्णी प्रवाश्यांनी केली आहे.(वार्ताहर)