चाचणी करून पेरा करा
By Admin | Updated: June 4, 2014 00:13 IST2014-06-04T00:13:27+5:302014-06-04T00:13:27+5:30
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे एक लक्ष पाच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.. विविध कंपन्याद्वारे ५५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध झाले असल्याची माहिती

चाचणी करून पेरा करा
एक लक्ष क्विंटल बियाणे : गायकवाड यांचा शेतकर्यांना सल्ला
वर्धा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे एक लक्ष पाच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.. विविध कंपन्याद्वारे ५५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध झाले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी आर.के.गायकवाड यांनी दिली.
बियाणे उपलब्ध होण्यापूर्वी बियाण्याचे कंपनीमार्फत उगवण क्षमतेची चाचणी केल्या जाते व चाचणीमध्ये प्रमाणित झाल्यानंतरच सदर बियाणे विक्रीकरिता उपलब्ध होते.; परंतु आपल्याकडे घरचे बियाणे उपलब्ध नसल्यास कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध असलेले सोयाबीचे बियाणे खरेदी करावे; परंतु सदर बियाणे वाहतुकीमुळे व इतर कारणाने हाताळतांना उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विकत घेतलेल्या बियाण्याची सुद्धा उगवण क्षमता तपासून व बिज प्रक्रीया करून सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून कृषी विस्तार अधिकार्यांनी पत्रकातून दिला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेकर्यांचे नुकसान होवू नये म्हणून सुरू वर्षी सोयाबीनची पेरणी करतांना सोयाबीन पिकामध्ये शेतकर्यांनी सहा ओळी नंतर एक ओळ तूर या प्रमाणे आंतरपिक घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे एकतरी पीक शेतकर्यांच्या हाती लागेल असे कृषी विभागाचे म्हणने आहे.(प्रतिनिधी)
सोयाबीन पेरतांना घ्यावयाची काळजी
शेकर्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याचा वापर पेरणीकरिता करावा. त्यामुळे शेतकर्यांचे सोयाबीन बियाणे खरेदीवरील खर्च कमी होईल. सोयाबीनमधील सर्वच वाण हे सरळ वाण आहे. त्यामुळे अशा वाणाचे बियाणे प्रत्येक वर्षी बदल करण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे दोन ते तीन वर्षांपर्यंत वापरता येतात; परंतु घरच्या बियाण्याची पेरणी पूर्व उगवण क्षमतेची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या उगवण क्षमतेची खात्री पटू शकते व पेरणी करताना बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज सुद्धा काढता येतो.