आरटीईमध्ये शाळांनी पटसंख्या लपविली
By Admin | Updated: May 27, 2016 01:58 IST2016-05-27T01:58:56+5:302016-05-27T01:58:56+5:30
शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार भरण्यात येणार असलेल्या जागांकरिता गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली.

आरटीईमध्ये शाळांनी पटसंख्या लपविली
पालकांचा आरोप : शिक्षण सभापतींना निवेदन सादर
वर्धा : शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार भरण्यात येणार असलेल्या जागांकरिता गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली. यावेळी या कायद्यात येत असलेल्या अनेक शाळांनी त्यांची पटसंख्या लपविल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे शिक्षण सभापती वसंत आंबटकर यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यातील १२० शाळा आरटीई अंतर्गत येत आहेत. या शाळांत असलेल्या जागांकरिता आलेल्या अर्जातील विद्यार्थ्यांना त्या शाळेत प्रवेश मिळावा याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली. ही सोडत काढताना तीन भांड्यात शुन्य ते नऊ असे अंक लिहून चिठ्ठी टाकण्यात आली होती. यातून झालेल्या सोडतीमधून अर्ज करणाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र ही पद्धत पालकांना न समजणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने यातून पालकांची दिशाभूल केल्याचे म्हणत शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या या प्रकारामुळे अनेकांचे पाल्य आरटीई पासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अनेक शाळांनी पटसंख्या कमी दाखविल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. या संदर्भात प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना तपासणी करण्याच्या सूचना करण्यात येईल. तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्रुट्या आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
- विजयकांत दुबे, शिक्षणाधिकारी (प्रभारी), जि.प. वर्धा.