शिक्षकांच्या कलगीतुऱ्यामुळे शाळा रात्रभर उघडी
By Admin | Updated: October 19, 2015 02:18 IST2015-10-19T02:18:52+5:302015-10-19T02:18:52+5:30
तालुक्यातील चिखली येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या दोन शिक्षकांचा कलगीतुरा मागील एक वर्षापासून चांगलाच गाजत आहे.

शिक्षकांच्या कलगीतुऱ्यामुळे शाळा रात्रभर उघडी
सकाळी शाळा उघडण्यास पालकांचा मज्जाव : अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा
देवळी : तालुक्यातील चिखली येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या दोन शिक्षकांचा कलगीतुरा मागील एक वर्षापासून चांगलाच गाजत आहे. शनिवारी तर या शिक्षकांनी शाळेला कुलूप न लावता घर जवळ केल्यामुळे ही शाळा रात्रभर उघडी राहिली. गुरुवर्याच्या कार्यपद्धतीवर आधीच वैतागलेल्या गावातील पालकांनी शाळेला कुलूप ठोकून या शिक्षकांना शाळेत येण्यास मज्जाव केला. तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पं.स. गटशिक्षणाधिकारी सतीश आत्राम व केंद्रप्रमुख नंदा खडसे यांनी शाळा गाठून घटनास्थळी पंचनामा केला. या दरम्यान सकाळच्या शाळेचे दरवाजे तब्बल १० वाजता उघडण्यात आली.
तालुक्यातील चिखली हे एक हजार लोकवस्तीचे गाव आहे. याठिकाणी जि.प. प्राथमिक शाळा आहे. चार वर्ग व दोन शिक्षक या निकषाप्रमाणे याठिकाणी मुख्याध्यापक अन्नपूर्णा पारीसे व शिक्षक म्हणून भीमराव खोडे सेवा देत आहेत; परंतु या शिक्षकांचे आपसात कधीही न पटल्यामुळे या शाळेचा आखाडा झाला आहे. शिक्षक खोडे हे गावातील लोकांसाठी रोषाचे कारण बनले आहे. नियमित शाळेत न येणे, शाळेतून शेतात जाणे, कोणी आक्षेप घेतल्यास हमरीतुमरीवर येणे आदी कारणांसह विद्यार्थ्यांसोबत अश्लिल वार्तालाप करीत असल्याच्या त्यांच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या.
या तक्रारीवरून जि.प. मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस देत पगारातून पाच इन्क्रीमेंट कापण्याची तंबी दिली. याआधी आंजी बऱ्हाणपूर येथील एका गंभीर प्रकारात या शिक्षकावर एक इन्क्रीमेंट कापण्याची कारवाई करण्यात आली.
मुख्याध्यापक पदांसाठी आपल्याला डावलल्याचा आरोप खोडे यांचा आहे. आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेली व्यक्ती मुख्याध्यापकपदी आरूढ असल्यामुळे त्यांचा पारीसे यांच्यावर रोष आहे. घटनेच्या दिवशी केंद्रप्रमुख खडसे यांनी मुख्याध्यापकांची बैठक बोलाविल्यामुळे पारीसे या दिघी येथे गेल्या होत्या. चाबी ठेवली असताना सुद्धा खोडे यांनी शाळेला कुलूप न लावल्यामुळे हा प्रकार घडला. शिक्षक खोडे यांची बदली न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा ईशारा गावकऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
एकमेकांना अडचणीत पाडण्याच्या भानगडीतून हा प्रकार घडला. यासाठी शिक्षकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. खोडे यांच्याविषयी गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. अश्लिल भाषेत शिकवितो म्हणून त्याच्यावर कारवाई प्रलंबित आहे. शनिवारच्या घटनेचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.
- सतीश आत्राम, पं.स.गटशिक्षणाधिकारी