स्कूल बसला अपघात; चालकासह विद्यार्थी जखमी
By Admin | Updated: February 2, 2016 01:47 IST2016-02-02T01:47:50+5:302016-02-02T01:47:50+5:30
शाळेतन विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्याकरिता निघालेल्या स्कूल बसला भूगाव परिसरात अपघात झाला.

स्कूल बसला अपघात; चालकासह विद्यार्थी जखमी
भूगाव येथील घटना : लॉएड्स स्कूलची बस
वर्धा : शाळेतन विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्याकरिता निघालेल्या स्कूल बसला भूगाव परिसरात अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला तर सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उत्तम गाल्वा कंपनीच्या मुख्य द्वाराजवळ घडली. ही बस भूगाव येथील भवन्स लॉएड्स विद्या निकेतनची आहे.
वेदांत गोपाल राठी, प्रथमेश राजेश इंगोले, तंजिला बेग, नारंग निनावे, हृषीकेश महेश कुंभारे, नीतू महेश कुंभारे, मुक्ता मंगरूळकर अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे असल्याची माहिती सेवाग्राम रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली. या अपघातात चालक मनोज किन्हाळकर (४२) रा. वायगाव (नि.) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत व सेवाग्राम रुग्णालयात एकच गर्दी केली. विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याकरिता व त्यांना घरी सोडण्याकरिता शाळेकडून भंगार बसेस वापरण्यात येत असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला.
पोलीस सूत्रानुसार, भूगाव येथील भवन्स लॉयस्ट विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन एमएच ३१ - ६२३० ही बस मुख्य मार्गाकडे येत होती. दरम्यान येथील उत्तम गाल्वा कंपनीच्या द्वाराजवळ ही बसला अपघात झाला. बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्रोषाणे संपूर्ण परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढत त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. घटनेची माहिती सावंगी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (तालुका प्रतिनिधी)
भंगार बसमुळे अपघात ?
शाळेतून विद्यार्थ्यांना घरी सोडण्याकरिता व शाळेत नेण्याकरिता शाळा व्यवस्थापनाकडून भंगार बसचा वापर होत असल्याचा आरोप यावेळी पालकांकडून करण्यात येत होता. या संदर्भात शाळेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्याचे पालक बोलत होते. मात्र शाळेकडून या संदर्भात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळेच अपघात झाल्याचे म्हणत पालकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्याध्यापिकेची चुप्पी
शाळेच्या वाहनाला झालेल्या अपघाताबाबत मुख्याध्यापिका कीर्ती मिश्रा यांना विचारणा केली असता त्यांनी ‘या संदर्भात मी काहीच बोलण्याच्या स्थितीत नाही’ असे उत्तर दिले. यामुळे शाळेकडून या संदर्भात कुठलीही माहिती मिळू शकली नाही.