युरियाचा तुटवडा; शेतकरी हैरान
By Admin | Updated: September 18, 2014 23:39 IST2014-09-18T23:39:51+5:302014-09-18T23:39:51+5:30
खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही.

युरियाचा तुटवडा; शेतकरी हैरान
आर्वी : खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही. खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी पेरणी विलंबाने केली आहे. आता खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. खताची उपलब्धता करुन देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची डवरणी व फवारणीची कामे आटोपली आहे. आता पिकांची जोमदार वाढ असते. पिके परिपक्व होण्याच्या मार्गावर असल्याने या पिकांना योग्य वाढीसाठी युरिया खताची नितांत गरज असते. परंतू सध्या तालुक्यातील कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना युरिया न घेताच आल्या पावली परतावे लागते. हे चित्र तालुक्यातील अनेक गावात पहायला मिळते.
यावर्षी खरीप हंगामातील बराचसा काळ पावसाच्या विलंबाने वाया गेला. पावसाच्या आगमानानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. यानंतरही काहीकाळ पाऊस गडप झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. अखेर पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता पिकांची स्थिती समाधानकारक असताना पिकांना द्यायला खत नसल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक गावातील सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव असल्याने उर्वरीत पिकातून माफक उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. पिकांना देण्याकरिता युरियाच बाजाराच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी कोणती खते पिकांना द्यावी, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)