‘डिजीटल’ नवोपक्रमात सावंगी जि.प. शाळेची भरारी
By Admin | Updated: October 19, 2015 02:26 IST2015-10-19T02:26:22+5:302015-10-19T02:26:22+5:30
प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी ‘डिजीटल इंडिया’ची घोषणा केली. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील शेकापूर (बाई) केंद्रांतर्गत येणाऱ्या ..

‘डिजीटल’ नवोपक्रमात सावंगी जि.प. शाळेची भरारी
विद्यार्थ्यांना लागली संगणकाची गोडी : व्हिडिओच्या माध्यमातूनही होते अध्यापन
हिंगणघाट : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी ‘डिजीटल इंडिया’ची घोषणा केली. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील शेकापूर (बाई) केंद्रांतर्गत येणाऱ्या जि.प. प्राथमिक शाळा सावंगी (जोड) येथे ‘खडू-फळा’ या शाळेत जुन्या पद्धतीला फाटा देण्यात आला आहे. या शाळेने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत विद्यार्थ्यांना संगणकाद्वारे शिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे डिजीटल नवोपक्रमामध्ये शाळेने भरारी घेतली आहे.
सावंगी येथील शाळेची मुले इंग्रजीसोबतच मराठीत संगणकावर टंकलेखन करतात. कसल्याही सॉफ्टवेअरची मदत न घेता विद्यार्थी मराठीमध्ये टंकलेखन करतात. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पं.स. तसेच शेकापूर (बाई) केंद्राची ही शेवटची शाळा आहे. ती तालुक्यापासून सुमारे ४०-४५ किमी अंतरावर आहे. ही द्वी-शिक्षकीय शाळा असून मुख्याध्यापक वैभव राखडे व शिक्षक संग्राम चाटे हे दोघेही प्रयोगशील आहेत. येथे ई-लर्निंग, संगणक शिक्षण, गमतीदार गणित, कृतीयुक्त अध्ययन-अध्यापन व ज्ञानरचनावादाचे मार्गदर्शन केले जाते. इंटरनेटच्या माध्यमातून शाळेत यु-ट्यूब यावरून शैक्षणिक व कला विषयक व्हीडिओ अध्ययनासाठी दाखविले जातात. गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी देशपांडे, केंद्रप्रमुख ढगे तसेच सर्व विषयतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनात या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात.(तालुका प्रतिनिधी)