गिरडच्या सरपंचासह दोन सदस्यांवर अपात्रतेची तलवार
By Admin | Updated: June 9, 2017 02:00 IST2017-06-09T02:00:40+5:302017-06-09T02:00:40+5:30
येथील सरपंच चंदा कांबळे व सदस्य शुभांगी काटेखाये आणि शारदा बोधे या संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहेत.

गिरडच्या सरपंचासह दोन सदस्यांवर अपात्रतेची तलवार
प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे : सुनावणीकडे गावकऱ्यांचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : येथील सरपंच चंदा कांबळे व सदस्य शुभांगी काटेखाये आणि शारदा बोधे या संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी घरी शौचालय असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी शौचालयाच्या नावावर १२ हजार रुपयांची उचल केल्याचे विरोधकांनी उघड केले. त्याची तक्रार जिल्हाधिकारीकाऱ्यांकडे केली असून यावर येत्या २० जून रोजी सुनावणी होणार आहे. याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सरपंच व त्यांच्या दोन सहकारी सदस्यांनी केलेल्या हा अपहार विरोधी पक्षाचे सदस्य अश्विनी दाभणे व हमीद पटेल यांनी उघडकीस आणला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत सरपंच चंदा कांबळे यांनी पती प्रभाकर कांबळे यांच्या नावावर १२ हजार तर सदस्य शारदा बोधे या सदस्याने श्यामराव बोधे यांच्या नावे १२ हजार तसेच शुभांगी काटेखाये यांनी सासरे चंद्रभान काटेखाये यांच्या नावावर १२ हजार रुपयांची उचल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही रक्कम शासनाच्या एसबीएम योजनेतून उचलल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. सरपंच व सदस्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांनी सदर सदस्यांना मुंबई अधिनियम १९५८ चे १४(ग) नुसार नोटीस बजावून २० जून रोजी सुनावणीस बोलावले आहे. येथे होणाऱ्या सुनावणीकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.
सदर सदस्याचे शौचालय जीर्ण झाले. त्यामुळे ते पाडून शासनाच्या योजनेतील १२ हजार रुपये यादीत नाव असल्याने त्यांनी नवीन शौचालय बांधण्याचा प्रयत्न केला. यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही.
- दत्तात्रय दिवटे, ग्राम विकास अधिकारी ग्रा.प. गिरड