वर्धा : शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) परिसरात विविध समस्यांचा अंबार लागला असून ग्रामपंचायतीच्यावतीने त्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या येथील नागरिकांनी गुरुवारी ग्रामपंचयातीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. शिवाय विविध मागण्यांचे निवदेन निवासी जिल्हाधिकारी सुनील गाढे यांना दिले. त्यांनी निवेदनकर्त्यांचे म्हणणे ऐकूण त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. यात ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्याने नागरिकांच्या समस्या सोडविणे कठीण जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या ग्रामपंचायतीचा प्रभार असलेला ग्रामसेवक नागरिकांनी काही विचारणा केली असता योग्य उत्तर देत नसल्याचा आरोप आहे. शिवाय सरपंच व उपसरपंच गावातील समस्यांबाबत अनभिज्ञ असून त्या सोडविण्याकरिता त्यांच्याकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.गावातील लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावात ठिकठिकाणी कचारा साचला आहे. नाल्या तुंबल्या आहेत. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. डासांमुळे या भागातल नागरिकांना अनेक समस्या होत आहेत. यामुळे आजार पसरत आहे. याकडे लक्ष देण्याकडे कोणीच तयार नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. तसेच मागण्या सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निवासी जिल्हाधिकारी यांना निवदेन सादर केले. गाढे यांनी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकत त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यापालन अधिकाऱ्यांकडे पाठविले. यावेळी सुधीर आगलावे, उषा बसवंत, विमल काळे, सुषमा भेदरकर, मंगला भरणे, कविता बसवंत, नलिनी निशाने, सुमन सोनटक्के यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीला कुलूप
By admin | Updated: September 11, 2014 23:44 IST