‘यशोदे’तून सुरु होता वाळू उपसा; ‘कलेक्टर’ अन् ‘एसपीं’चा छापा  

By चैतन्य जोशी | Published: March 30, 2024 12:05 PM2024-03-30T12:05:02+5:302024-03-30T12:05:33+5:30

- सोनेगावात मध्यरात्रीची कारवाई : टिप्पर, पोकलॅन्ड, जेसीबीसह बोट जप्त 

sand lifting started from yashoda raid by collector and sp | ‘यशोदे’तून सुरु होता वाळू उपसा; ‘कलेक्टर’ अन् ‘एसपीं’चा छापा  

‘यशोदे’तून सुरु होता वाळू उपसा; ‘कलेक्टर’ अन् ‘एसपीं’चा छापा  

चैतन्य जोशी, वर्धा : देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथून वाहणाऱ्या यशोदा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा वारेमाप उपसा सुरु होता. अखेर पोलिस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी २९ रोजी मध्यरात्रीला छापा मारुन अवैध वाळू तस्करी उधळून लावली. 
सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीपात्रातून बोटीद्वारे जेसीबी आणि पोकलॅन्डच्या मार्फतीने मोठ्या प्रमाणात वाळूचा वारेमाप उपसा सुरु होता. याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना मिळाली होती. त्यांनी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळ गाठून अवैधरित्या होणाऱ्या वाळू उपसा उधळून लावला. 

पोलिसांनी जेसीबी, पाेकलॅन्ड, मोठी बोट, पाच १० चक्का वाळू भरुन असलेले टिप्पर, दाेन ते तीन ट्रॅक्टर असा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुमारे १२ ते १५ चालकांना अटक केलेल्याची माहिती असून जवळपास २०वर तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून पोलिस विभागाकडून सुरु असलेल्या धडाकेबाज कारवायांमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे, हे तितकेच खरे. 

शंभरावर पोलिसांची फौज घाटात दाखल 

पोलिस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह जवळपास शंभरावर पोलिसांची फौज सोनेगाव बाई येथील वाळू घाटावर पोहचली होती. सुमारे १५ ते २० गाड्यांचा ताफा गावातून नदीपात्राकडे गेला होता. पोलिसांना पाहून काही तस्करांनी तेथून पळ काढला. मात्र, काहींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अद्यापही देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: sand lifting started from yashoda raid by collector and sp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा