रूपेशच्या नरबळीने समाजमन सुन्न

By Admin | Updated: November 15, 2014 22:50 IST2014-11-15T22:50:50+5:302014-11-15T22:50:50+5:30

अतिशय क्रूरपणे रूपेशची हत्या करून त्याचा नरबळी दिला तो केवळ गुप्तधनाच्या लालसेपोटी. गळा दाबून रूपेशचा हत्या केल्यानंतर नराधमाचे एकेक कृत्य मनुष्यात राक्षसीवृत्ती अद्यापही कायम

Sameshan's numbness with Rupesh's innocence | रूपेशच्या नरबळीने समाजमन सुन्न

रूपेशच्या नरबळीने समाजमन सुन्न

आरोपीच्या एकेका कृत्याने राक्षसी वृत्तीचा परिचय : कापून नेलेले अवयव भाजून मीठ लावून खाल्ले
वर्धा : अतिशय क्रूरपणे रूपेशची हत्या करून त्याचा नरबळी दिला तो केवळ गुप्तधनाच्या लालसेपोटी. गळा दाबून रूपेशचा हत्या केल्यानंतर नराधमाचे एकेक कृत्य मनुष्यात राक्षसीवृत्ती अद्यापही कायम असल्याचा प्रत्यय देणारी आहे. त्याने रूपेशचे कापून नेलेले अवयव भाजून मीठ लावून खाल्ले, ही बाब समाजमन सुन्न करणारी आहे.
शनिवार दि. ८ नोव्हेंबर हा दिवस वर्धेकरांसाठी काळा ठरला. नऊ वर्षीय रूपेश मुळे हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. तो दिसत नसल्याचे लक्षात येताच माझा मुलगा कुठे गेला? तुम्ही बघितला काय? असा केविलवाणा प्रश्न विचारात त्याची आई मिळेल त्या दिशेने आपल्या पोटच्या गोळ्याचा शोध घेत होती. प्रत्येकांकडून नाही हेच उत्तर ऐकून माऊली ती बेचैन झाली. दाटलेला कंठ आणि डोळ्यात आसवे घेऊन ती पोलीस ठाण्यात पोहचली. साहेब, माझा मुलगा खेळता खेळता बेपत्ता झाला हो. तो कुठे सापडत नाही. त्याला शोधून द्या , अशी विनवणी ती करू लागली. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. तिचा रूपेश तिला कधीच भेटणार नाही. हे त्या माऊलीला काय ठाऊक? दुसऱ्या दिवशी सकाळी रूपेशचा मृतदेहच गवसल्याने तिच्या दु:खाला पारावार उरला नाही. वडार समाजात शिक्षितांचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके आहे. रूपेश याच समाजातील असून तो इयत्ता ४ थीमध्ये शिकत होता. ही बाब समाजासाठी गौरवाची होती. या होतकरू मुलाची इतकी क्रूरपणे कुणी, कशासाठी हत्या केली? या प्रश्नाचे उत्तर कुणाजवळही नव्हते. खेळता खेळता मुलगा गायब होत असेल आणि त्याची हत्या केली जात असेल तर ही बाब कोवळे आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे, समाजाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. प्रत्येक पालकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करणारी आहे. हे हेरून ‘लोकमत’ने या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे, वर्धेकरांच्या आणि विशेष करुन तमाम पालकांच्या मनातली भीती कायमची हद्दपार होऊन रूपेशला न्याय मिळाला पाहिजे, या हेतूने प्रकरण सातत्याने लावून धरले. यानंतर वर्धेकरही हळूहळू या प्रकरणाशी जुळत गेले. यानंतर खऱ्या अर्थाने रूपेशला न्याय द्या, त्याच्या मारेकऱ्याला फाशी द्या, रूपेशचे अवयव काढून त्याची क्रूरपणे हत्या करणाऱ्याला तात्काळ अटक करा, या मागण्यांसाठी वर्धेकर रस्त्यावर उतरले. दुसरीकडे पोलीस प्रशासनापुढेही रूपेशच्या मारेकऱ्याला शोधून काढणे मोठे आव्हान होते. अशातच पोलिसांचे हात आसिफ शहा वल्द अजीम शहा उर्फ मुन्ना पठाण या संशयितापर्यंत पोहचले. तोच खरा आरोपी असेल असे पोलिसांनी सुरुवातीला वाटत नव्हते. जसजसा तपास पुढे गेला. तसा पोलिसांचा संशयही पक्का होत गेला. अखेर आरोपीने रूपेशची हत्या केल्याची कबुली दिली. मात्र त्याने हत्या का केली, यासाठी पुन्हा तो पोलिसांना चकवू लागला. अखेर त्याच्याकडून सत्य वदवून घेण्यात पोलिसांना यश आले. त्याने रूपेशचा नरबळी दिल्याचे कबुल केले. हे कृत्य त्याने कसे केले, ही बाब अंगावर शहारे आणणारी आहे. एखादी व्यक्ती इतकी क्रूर होऊ शकते, याचा प्रत्यय या घटनेतील त्याने केलेल्या एकेका लक्षात कृत्यातून आल्यावाचून राहात नाही. त्याने सायंकाळी रूपेशला फिरायला नेतो म्हणून घेऊन गेला. आलोडी मार्गे बायपासकडे जाणाऱ्या मार्गावर त्याची गळा दाबून निर्दयीपणे हत्या केली. मृतदेह विकास विद्यालयाच्या मागील बाजूला निर्जनस्थळी आणला. ब्लेडच्या सहाय्याने त्याने त्याचे डोळे काढले. तरीही त्याला त्याचे काहीही वाटले नाही. यानंतर त्याने त्याच्या दोन्ही किडण्या काढल्या. इतकेच नव्हे, तर त्याने त्याचे गुप्तांग कापले. यानंतर रूपेशचा मृतदेह तिथेच टाकून तो महाकाळी धरणाच्या कालव्यावर गेला.
तिथे चुल पेटवून ते अवयव भाजले. आणि त्याला मीठ लावून खाल्ले. हे राक्षसी कृत्य करताना त्याला कशाहीची पर्वा वाटली नाही. यानंतर त्याने पहाटेपर्यंत परिसरातील एका मंदिरात नग्न अवस्थेत पूजा-अर्चा केली. आपल्याला अघोरी शक्ती प्राप्त झाली, अशा अविभार्वात तो घरी पतरला. आता आपले कोणीच बिघडवू शकत नाही. कुणालाही आपल्यावर संशय येणार नाही, अशा पद्धतीने शहरात वावरु लागला. मात्र त्याचे हे राक्षसी कृत्य फारकाळ लपून राहिले नाही.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Sameshan's numbness with Rupesh's innocence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.