एकाच दिवशी पडली २३४ नवीन कोविड बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:00:27+5:30
जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २३४ नवीन कोविड बाधित सापडल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. नवीन कोविड बाधितांमध्ये पहिल्या फळीतील काही कोविड योद्धांचा समावेश असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील विविध विभागात काम करणाऱ्या कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात २३४ नवीन कोविड बाधित आढळले असून त्यात १३८ पुरुष तर ९६ महिलांचा समावेश आहे.

एकाच दिवशी पडली २३४ नवीन कोविड बाधितांची भर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. शनिवारी जिल्ह्यात तब्बल २३४ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता १४ हजार ६२३ झाली आहे. कोविड-१९ हा विषाणू जिल्ह्यात दिवसेंदिवस आपला व्याप्ती वाढवित असल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे.
जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २३४ नवीन कोविड बाधित सापडल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. नवीन कोविड बाधितांमध्ये पहिल्या फळीतील काही कोविड योद्धांचा समावेश असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील विविध विभागात काम करणाऱ्या कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात २३४ नवीन कोविड बाधित आढळले असून त्यात १३८ पुरुष तर ९६ महिलांचा समावेश आहे. या नवीन कोविड बाधितांपैकी लक्षणविरहित तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या कोविड बाधितांना स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर गंभीर कोरोना बाधितांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सध्या १ हजार २१५ ॲक्टिव्ह कोविड बाधित असून यापैकी बहूतांश ॲक्टिव्ह कोविड बाधित सध्या गृहअलगीकरणात आहेत. तर गंभीर रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन महिलांसह पाच पुरुषांचा घेतला कोविडने बळी
शनिवारी जिल्ह्यात तब्बल २३४ नवीन कोविड बाधितांची भर पडली असून एकाच दिवशी दोन महिलांसह पाच पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. मृतकांमध्ये वर्धा तालुक्यातील ८१ वर्षीय पुरुष, ३८ व ७२ वर्षीय महिला, आर्वी तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, देवळी तालुक्यातील ५७ व २८ वर्षीय पुरुष तर कारंजा तालुक्यातील ७९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३८४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार २१५ ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत.