कुत्र्यांच्या तावडीतून वाचवून सांबराच्या पिलाला जीवदान
By Admin | Updated: October 21, 2015 02:25 IST2015-10-21T02:25:11+5:302015-10-21T02:25:11+5:30
ढगा भुवन परिसरात कुत्र्याच्या कळपाने जखमी केलेल्या सांबराच्या पिल्याला पशुवैद्यकाकडून उपचार करून घेत जंगलात सोडण्यात आले.

कुत्र्यांच्या तावडीतून वाचवून सांबराच्या पिलाला जीवदान
मासोद येथील घटना : पिलाला जंगलात सोडल्यामुळे टीका
आकोली : ढगा भुवन परिसरात कुत्र्याच्या कळपाने जखमी केलेल्या सांबराच्या पिल्याला पशुवैद्यकाकडून उपचार करून घेत जंगलात सोडण्यात आले. याबाबत वन्यजीव अभ्यासकाकडून टिकेचा सूर उमटला आहे.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास रामबाबा समाधी मंदिरात पुजारी मनोहर महाराज यांच्या समवेत बिपीन पांडे, शेख आसिफ, सोयल शेख हे बसले होते. दरम्यान जंगलातील झाडांतून कुत्र्यांचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने ही मंडळी गेली असता कुत्रे सांबराला चावा घेत असल्याचे दिसून आले. त्यांनी दगड मारून कुत्र्यांना हाकलून सांबाराच्या पिल्याला कुटीत आणले. त्याला दूध पाजल्यानंतर खरांगणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण प्रतिसाद मिळाला नाही. उपवन संरक्षक मुकेश गणात्रा यांचाही भ्रमणध्वनी प्रतिसाद देत नव्हता. अखेर वनविभागाच्या वर्धा कार्यालयाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली.
त्यांच्या सूचनेवरून वनरक्षक राऊत हे मासोदच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दाखल झाले. जखमी पिल्यास पिपल्स फॉर अॅनिमलकडे दाखल न करता उपचार करून जंगलात सोडण्यात आले. एकदा उपचार करून ते सुधारले नाही तर जंगलातील वन्यजीवांपासून त्यास धोका होऊ शकतो.(वार्ताहर)