वर्धेत विना परवाना व्यवसाय करणाऱ्या चहा कंपनीवर विक्रीबंदी
By Admin | Updated: February 21, 2017 01:05 IST2017-02-21T01:05:00+5:302017-02-21T01:05:00+5:30
सावंगी (मेघे) येथील रॉयल ब्लेंड अॅन्ड पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या चहा कंपनीची चौकशी केली असता येथे विनापरवाना चहाचे उत्पादन व रिपॅकींग होत असल्याचे निदर्शनास आले.

वर्धेत विना परवाना व्यवसाय करणाऱ्या चहा कंपनीवर विक्रीबंदी
रद्दबादल परवान्यावर व्यवसाय : १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त; औषध प्रशासनाची कारवाई
वर्धा : सावंगी (मेघे) येथील रॉयल ब्लेंड अॅन्ड पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या चहा कंपनीची चौकशी केली असता येथे विनापरवाना चहाचे उत्पादन व रिपॅकींग होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सदर कंपनीत उत्पादित केलेला १ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा चहाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच विना परवाना व्यवसाय करीत असल्यामुळे पुढील आदेशापर्यंत सदर कंपनीद्वारे चहाचे उत्पादन व विक्री करण्यात येऊ नये, असे आदेश सदर पेढीचे मालक सॅम पिटरला अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) जयंत वाणे यांनी दिले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०१७ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी, ललीत सोयाम व रविराज धाबर्डे यांनी सावंगी स्थिती कलावती कॉम्पलेक्समधील रॉयल ब्लेंड अॅन्ड पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भेट दिली होती. सदर पेढीच्या तपासणीअंती त्यांच्याकडे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गचा अन्न व्यवसाय करण्याकरिता आवश्यक असणारा परवाना सप्टेंबर २०१६ मध्ये संपल्याचे दिसून आले. असे असताना या पेढीने त्याचे नुतनीकरण केले नव्हते. त्यामुळे सदर पेढी आॅक्टोबर २०१६ पासून विना परवाना रेक्स ब्रॅन्ड या चहापत्तीचे उत्पादन व विक्री करीत असल्याचे पेढीच्या कागदपत्रावरून लक्षात आले.
सदर पेढीत रेक्स ब्रॅन्डचे २५० ग्रॅम व १०० ग्रॅम पॅकेट्स विक्रीकरिता उत्पादन करून साठवणूक केली असल्याचे आढळून आले होते.
सदर उत्पादीत केलेल्या चहापत्ती पावडर रेक्स ब्रॅन्डच्या पॅकेटवर मुदत संपलेला परवाना क्रमांक टाकून शासन व ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी ललीत सोयाम यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत सदर पेढी विना परवाना व्यवसाय करीत असल्यामुळे एकूण किंमत १ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
तसेच सदर पेढी विना परवाना व्यवसाय करीत असल्यामुळे पुढील आदेशापर्यंत चहापत्तीचे उत्पादन, विक्री, साठवणूक तसेच वितरण करू नये, असे लेखी आदेश सहायक आयुक्त (अन्न), तथा पदावधीत अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.) वर्धाचे जयंत वाणे यांनी सदर पेढीचे मालक सॅम पिटर यांना दिले आहेत. सदरची संपूर्ण कार्यवाही कार्यालयातील अधिकारी ललीत सोयाम व रविराज धाबर्डे यांनी जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनात केली.(प्रतिनिधी)