उगमपत्र नसल्याने रोखली आठ लाखांच्या बियाण्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:22+5:30
खरीप हंगाम सुरू झाला असून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशात बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकांनी मागील तीन दिवसांत विशेष मोहीम हाती घेऊन १५ ते २० कृषी सेवा केंद्र व गोदामांची तपासणी केली.

उगमपत्र नसल्याने रोखली आठ लाखांच्या बियाण्यांची विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाचे आगमन होताच बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करतात. याच दरम्यान बोगस बियाणेही बाजारपेठेत येत त्याची विक्री होते. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या हेतूने कृषी विभागाकडून सध्या धडक कृषी केंद्र तपासणी मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान ११ कृषी केंद्रांमध्ये उगमपत्र नसलेले आठ लाख रुपये किंमतीचे बियाणे आढळून आल्याने त्या बियाण्यांच्या विक्रीला ब्रेक लावण्यात आला आहे. शिवाय सदर कृषी केंद्र व्यावसायिकांना त्या बियाण्यांबाबतचे आवश्यक कागदपत्र दहा दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खरीप हंगाम सुरू झाला असून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशात बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकांनी मागील तीन दिवसांत विशेष मोहीम हाती घेऊन १५ ते २० कृषी सेवा केंद्र व गोदामांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान दुकानदाराचे बियाणे, खत, किटकनाशके परवाना, साठा नोंदवही, बिल बुक, विक्री करीत असलेले बियाणे, खताचे उगमपत्राची तपासणी करण्यात आली.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत जिल्ह्यातील अकरा कृषी केंद्रांमध्ये उगमपत्र नसलेले आठ लाख रुपये किंमतीचे बियाणे आढळून आल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय सदर कृषी केंद्र व्यावसायिकांना त्यांची बाजू मांडण्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनात कृषी उपसंचालक अजय राऊत, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पी. ए. घायतिडक यांनी केली असून सदर मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे.