आंदोलकांवर वेतनकपातीची तलवार
By Admin | Updated: March 5, 2016 02:16 IST2016-03-05T02:16:03+5:302016-03-05T02:16:03+5:30
गत १७ दिवसांपासून ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू आहे. याचा परिणाम विविध कामांवर होत असून याचा त्रास नागरिकांनाही होत आहे.

आंदोलकांवर वेतनकपातीची तलवार
ग्रामसेवकांना त्यांच्या कार्यस्थळी रूजू होण्याची नोटीस
वर्धा : गत १७ दिवसांपासून ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू आहे. याचा परिणाम विविध कामांवर होत असून याचा त्रास नागरिकांनाही होत आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने या गामसेवकांना कामावर रूजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी त्यांच्या कार्यस्थळी रूजू होणार नाही त्यांचे आंदोलनाच्या दिवसापासूनचे वेतन कपात करण्यात येईल, असे नोटीस जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांच्या आदेशाने गटविकास अधिकाऱ्यांकडून बजाण्यात आले आहेत.
गुरुवारी आंदोलनासंदर्भात गैरसमज पसरविणाऱ्या तीनही सदस्यांना संघटनेतून कमी करण्यात आले आहे. शिवाय या संदर्भातील निर्णय ८ मार्च रोजी संघटनेचे राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. कार्यस्थळी रूजू न होण्याबाबत संघटनेच्यावतीने कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र तसा कुठलाही दबाव नाही. संघटनेत गैरसमज पसरविण्याकरिता हा प्रकार होत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन वाघमारे म्हणाले.
सावंगी (मेघे) ग्रामपंचयातींतर्गत बांधकामाच्या परवानगीच्या कारणावरून येथील ग्रामसेवक व सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला. या विरोधात ग्रामसेवकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे काम खोळंबले आहे. याचा त्रास सर्वसामान्याना होत असून आंदोलन मागे घेण्याबाबत ग्रामसेवकांना सूचना करण्यात आल्या आहेत. तशी नोटीस जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना यांनी शुक्रवारी दिली.
गुरुवारी ग्रामसवेक संघटनेच्या तीन सदस्यांनी आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेला दिले. तर आज सकाळी संघटनेच्या अध्यक्षांनी आंदोलन सुरूच असल्याचे पुन्हा पत्र दिले. यामुळे आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. आंदोलन सुरू आहे अथवा नाही या बाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे सीईओ म्हणाले.
शुक्रवारी या ग्रामसेवकांना रूजू होण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. सायंकाळपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांकडून किती ग्रामसेवक रूजू होतात याची माहिती घेण्यात येत आहे. यात दुपारपर्यंत तीन ग्रामसेवक रूजू झाल्याची माहिती होती. सायंकाळपर्यंत रूजू झालेल्या ग्रामसेवकांना वगळता इतरांवर वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)
राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत निर्णय
ग्रामसेवकांच्या आंदोलनाची दिशा येत्या ८ मार्च रोजी ठरणार आहे. या दिवशी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे (पाटील) व सरचिटणीस प्रशांत जमोदे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत आंदोलनासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव आम्हालाही आहे; परंतु प्रशासनाच्या हेकेखोरीपुढे आम्हीही हतबल आहोत. असे असले तरी आणखी ८ मार्चपर्यंत तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन वाघमारे यांनी दिली.