सालदाराचे पॅकेज @ १.१५ लाख रुपये
By Admin | Updated: March 26, 2017 01:04 IST2017-03-26T01:04:35+5:302017-03-26T01:04:35+5:30
गुडीपाडवा आला की बळीराजाचा सालदाराचा शोध सुरू होतो. वर्षभराकरिता शेतीची कामे करण्याकरिता असलेल्या या सालदाराचे साल आता चांगलेच वधारल्याचे दिसत आहे.

सालदाराचे पॅकेज @ १.१५ लाख रुपये
बळीराजा अवाक् : सोबत महिन्याला ४० पायल्या गहू
किशोर तेलंग तळेगाव (टालाटुले)
गुडीपाडवा आला की बळीराजाचा सालदाराचा शोध सुरू होतो. वर्षभराकरिता शेतीची कामे करण्याकरिता असलेल्या या सालदाराचे साल आता चांगलेच वधारल्याचे दिसत आहे. तळेगावात १.१५ लाख रुपये आणि महिन्याचे ४० पायल्या गहू या बोलीवर सालदार ठरविण्यात आला आहे. सालदार लाखाच्या वर जात असलेल्या या पॅकेजमुळे कामाकरिता सालदार ठेवावा की शेती करावी, अशी काहीशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
बी-बियाण्यांचे वाढत असलेले दर व दिवसागणिक पडत असलेले शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यातच कधी निसर्ग साथ देतो तर कधी हातचा घास हिसकावतो, यामुळे शेती करावी अथवा नाही, या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी असल्याचे दिसत आहे.
पाच वर्षांपूर्वी ४० ते ६० हजार रुपयांपर्यंत सालदाराचे साल होते; पण योग्य सालदाराच मिळत नसल्याने गत पाच वर्षांत यात दहा ते वीस हजार रुपयांची वाढ झाली. आज तर साल १ लाख १५ हजार रुपये व महिन्याच्या ४० पायल्या गहू एवढे ठरले आहे. दिवसेदिंवस निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत चार वर्षांत सोयाबीन आणि कपाशीच्या उत्पन्नातही घट झाली आहे. झालेल्या उत्पदनाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. यातच दिवसेंदिवस मजुरीचे दर गगणाला भिडत आहेत. रासायनिक खते आणि बियाण्यांचेही भाव वाढल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. शेतकऱ्यांचे जीवन शेतीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीची मजुरी, निंदणाचा खर्च, कापूस वेचनी, खते तसेच शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून उधारीवर घेतलेले व्याज, अशा अनेक बाबींमध्ये वाढ झाल्याने शेती शेतकऱ्याला विंवचनेत टाकणारी ठरत आहे.
सध्या जरी यंत्राच्या माध्यमातून शेती केली जात असली तरी शेतीकरिता योग्य सालदार मिळावा, अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते. यामुळेच की काय, उत्तमोत्तम काम करणाऱ्या सालदाराला तळेगावात लाख रुपयांवर साल मिळाले असल्याचे दिसून येत आहे.
सालदाराचेही तीन स्तर
गावात तीन प्रकारचे सालदार आहेत. या सालदारांना ए बी आणि सी, अशी श्रेणीत विभागले जाते. जे मोठे व्यापारी व शेतकरी आहेत, ते ए श्रेणीतील सालदाराला पसंती देतात. त्याचे या वर्षाचे साल १ लाख १५ हजार रुपये आहे. बी श्रेणीच्या सालदाराला १ लाख ५ हजार रुपये आणि सी श्रेणीच्या सालदाराला ५५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत साल देण्यात येत आहे. या सालाव्यतिरिक्त गहु वेगळे, अशी पद्धत गावात रूढ आहे.
महाशिवरात्री उत्सवात सालदार चर्चेतून ठरवितात साल
गुडी पाडव्याला एक महिना वेळ असताना तळेगावात महाशिवरात्रीची यात्रा असते. याच दरम्यान सालदार हे एकमेकाचा विचार घेऊन यावर्षी आपण किती साल घ्यायचे, हे ठरवित असतात.
बाहेर गावातूनही होते ेसालदाराची आयात
गावातील सालदार परवडत नसल्याने काही शेतकरी बाहेर गावातून सालदार आणतात; पण तोही दुसऱ्या वर्षी गावाची प्रथा पाहून आपला भाव वाढवितो. असे असले तरी सालदाराच्या या वाढीव दरामुळे शेतकरी मात्र बेजार झाला आहे.