पराग मगर वर्धाशहरातील सिव्हील लाईन परिसरात पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरात सागाची पाच झाडे पूर्णत: वाळली आहेत. लगतच वन विभागाचे मुख्य कार्यालय आहे. नेमकी सागाचीच झाडे व तीही शिस्तबद्ध पद्धतीने वाळविल्याचे निदर्शनास येते़ यामुळे ती वाळली की वाळविली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय कार्यालय परिसरातील झाडांचीच सुरक्षा धोक्यात आल्याने जिल्ह्यातील इतर झाडांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे़ सिव्हील लाईन परिसरात पाटबंधारे आणि उपवन संरक्षक विभागाचे मुख्य कार्यालय आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या भिंतीलगत विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत़ यात काही झाडे सागाची आहेत; पण यापैकी केवळ सागाचीच तब्बल पाच झाडे पूर्णत: वाळली आहेत़ केवळ वाळलीच नाही तर यातील तीन झाडे उन्मळून बाजूच्या झाडांवर पडली आहेत. विशेष म्हणजे दुसरी कुठली झाडे न पडता केवळ सागाचीच झाडे पडल्याने संशय व्यक्त होत आहे़ या झाडांची प्रत्यक्ष पाहणी केली असता ही झाडे खन्न वाळली आहेत़ वाळलेली झाडे पाहून ती वाळविल्याची शक्यता दिसते़ झाड वाळविण्यासाठी आधी त्या झाडाची साल खालच्या बाजूने पूर्णत: काढली जाते. तसे केल्यावर काही काळात साल वाळत जाऊन पूर्ण झाड वाळते़ असाच प्रकार या पाचही झाडांबाबत दिसून येत असल्याने ही झाडे जाणीवपूर्वक कुणीतरी वाळविल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाटबंधारे कार्यालय परिसराला लागूनच उपवन संवर्धन विभागाच्या कार्यालय आहे. शासकीय कार्यालय परिसरातीलच झाडे अशा प्रकारे वाळत असेल तर जिल्ह्यातील इतर झाडांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वन विभागासमोरचीच सागाची झाडे वाळविली
By admin | Updated: January 23, 2015 01:49 IST