अफरातफरीच्या तक्रारीबाबत उदासिनता
By Admin | Updated: May 20, 2016 01:48 IST2016-05-20T01:48:06+5:302016-05-20T01:48:06+5:30
येथील पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक सुयोग ठाकरे याने सन २०१४-१६ पर्यंत १६ लाख ६६ हजार रुपयांची अफरातफर केल्याचे चौकशीत उघड झाले.

अफरातफरीच्या तक्रारीबाबत उदासिनता
गटविकास अधिकाऱ्याकडून सीईओंच्या आदेशाला बगल
समुद्रपूर : येथील पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक सुयोग ठाकरे याने सन २०१४-१६ पर्यंत १६ लाख ६६ हजार रुपयांची अफरातफर केल्याचे चौकशीत उघड झाले. याची सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना होताच त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या; मात्र गटविकास अधिकाऱ्याकडून या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. यामुळे या घोळात त्यांचा सहभाग असल्याची चर्चा पं.पय.च्या आवारात आहे.
या लिपिकाने केलेल्या घोळाची चौकशी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागामार्फत करण्यात आली. या चौकशीत झालेली अफरातफर सिद्ध झाल्यानंतर १० मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या. या आदेशाला गुरुवारी १० दिवस होत असताना या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
या संदर्भात समुद्रपूर पोलीस ठाण्यात गट शिक्षणाधिकारी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ११ मे रोजी तक्रार दाखल करण्याकरिता गेले होते; मात्र तक्रारीत अपूर्ण माहिती असल्याचे म्हणत पोलिसांना त्यांना परत पाठविले. या तक्रारीत अफरातफरीतील संपूर्ण कागदपत्रे पुराव्यानिशी दिल्यास कायदेशीर चौकशी करता येईल, असे ठाणेदार रंजीतसिंग चव्हाण यांनी तक्रारकर्त्यांना सांगितले. असे असता अद्यापही तक्रार दाखल करण्यात आली नाही. यामुळे पंचायत समिती प्रशासन भ्रष्टाचाऱ्यास अभय देत असल्याची ओरड होत आहे.(तालुका प्रतिनिधी)